दीपक शिंदेसातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी विधी व न्यायमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात गेल्या ३५ वर्षांपासून वर्चस्वाचा वाद आहे. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय.
स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली.
१९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले.
पृथ्वीराज चव्हाण केंद्रातून राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी जागा सोडण्यास विलासकाका उंडाळकर यांनी नकार दिला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढविली आणि सात वेळा आमदार असलेल्या विलासकाका पाटील-उंडाळकर यांचा पराभव झाला. त्यानंतर आणखीनच वाढलेले वैरत्व आता संपत आहेत.स्थानिक अडचण दूर अन् राज्याचीही बांधणीविलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या ताब्यात असलेल्या कोयना दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती आणि पंचायत समिती ताब्यातून जाऊ नये. याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण गटाची साथ मिळाली तर वर्चस्व ठेवण्यास काहीच अडचण येणार नाहीत. याची जाणीव झाल्यानेच विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी मनोमिलनाचे नियोजन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनाही काँग्रेसमध्ये असलेले मतभेद विसरून आता काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी करण्याचे काम सुरू असल्याचे दाखवून द्यायचे आहे.