लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दोन महिन्यांचे वेतन ठेकेदाराकडून अदा करण्यात न आल्याने सातारा पालिकेच्या ३० घंटागाडीचालक व सहायकांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ३० टन कचरा हा घरातच पडून राहिला. जोपर्यंत वेतन अदा केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा घंटागाडीचालकांनी दिला आहे.
सातारा पालिकेने चाळीस घंटागाड्या खरेदी केल्या असून, त्या एका खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. ४० पैकी ३० घंटागाड्यांचा ठेका पुणे येथील एका खासगी कंपनीने घेतलेला आहे. प्रत्येक घंटागाडीवर चालक व सहायक असे दोन कर्मचारी काम करतात. चालकाला प्रतिमहा आठ, तर सहायकाला सात हजार रुपये मानधन ठेकेदाराकडून दिले जाते. संचारबंदी मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांची रोजीरोटी थांबली आहे. अशा परिस्थितीत ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे बिल अद्याप अदा केले नाही. वारंवार सांगूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचा आरोप करत घंटागाडी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला.
साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथे सर्व घंटागाड्या लावण्यात आल्या. या आंदोलनाची माहिती मिळताच संबंधित कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत ढाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र कर्मचारी आपल्या मतावर ठाम होते. जोपर्यंत दोन महिन्यांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत घंटागाडी सुरू करणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला. या आंदोलनाचा फटका कचरा संकलनाला बसला. घंटागाडीचा न आल्याने सुमारे ३० टन कचरा हा सातारकरांच्या घरातच पडून राहिला.
(चौकट)
पालिकेने पैसे दिले ठेकेदाराने अडविले..
पालिकेकडून संबंधित ठेकेदाराला कर्मचार्यांच्या वेतनाची रक्कम वेळोवेळी अदा केली जाते. सद्यस्थितीला पालिकेकडे ठेकेदाराचे कोणतेच बिल थकीत नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे बिल का रखडवले आहे, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याची माहिती घेऊन मुख्याधिकार्यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
फोटो :
सातारा पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केल्याने सर्व घंटागाड्या हुतात्मा स्मारकात दिवसभर उभ्या होत्या. (छाया : जावेद खान)