सातारा : जिल्ह्यात पावसाने मारलेली दडी कायम असून जूनपासून आतापर्यंतचा विचार करता सरासरीपेक्षा कमीच पर्जन्यमान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. तसेच दुबार पेरणीचेही संकट निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात या वर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सूनचा पाऊस दाखल झाला. वेळेवर सुरुवात केलेल्या पावसाने सुरुवातीच्या काही दिवसांत दमदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर धुवाधार पाऊस कोसळत होता. सलग चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. तर मागील २० दिवसांपासून पावसाची दडी कायम आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवशावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. भातलावणीची कामे सुरु केली. पूर्व भागातही ओल पाहून अनेक शेतकऱ्यांनी खरीपची पेरणी उरकली. पण, आता २० दिवसांपासून पावसाची दडी असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पिके चांगली उगवली आहेत. अशा काळात पाण्याची आवश्यकता असते. पण, सध्या पावसाचे आगमनच नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही. पाऊस पडेल या आशेवर शेतकरी होते.
चौकट :
जिल्ह्यात सरासरी १९८ मिलिमीटर पाऊस...
जिल्ह्यात जून महिन्यापासून ५ जुलैपर्यंत सरासरी २३४ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, या वर्षी फक्त १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा, कऱ्हाड, जावळी, पाटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई आणि महाबळेश्वर या तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.
.........................................................