लोकमत आॅनलाईन
खंडाळा (जि. सातारा), दि. ६ : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी प्रदेशाचे क्षेत्र वगळून खंडाळा तालुक्यासह उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र उक्त प्रदेश म्हणून शासनाने घोषित केले आहे. या नव्या घोषणेमुळे खंडाळा तालुक्यातील विकासात्मक प्रकिया अडचणीत येण्याची शक्यता आहे. खंडाळा तालुका पुन्हा बॅकफूटला जाऊन तालुक्यात होऊ घातलेल्या औद्योगिक विस्तारीकरणाला खीळ बसणार आहे. याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर होण्याची चिन्हे आहेत. या नव्या निर्णयाची उकल न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पाचगणी हा प्राकृतिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेश वगळून उर्वरित सातारा जिल्ह्याचे क्षेत्र शासनाच्या नगर विकास विभागाने उक्त प्रदेश म्हणून नियत केले आहे. या उक्त प्रदेशाची योजना तयार करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातारा प्रादेशिक नियोजन मंडळ गठीत केले आहे. ही प्रारुप प्रादेशिक योजना प्रादेशिक नियोजन मंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र शासन राजपत्र जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सहायक संचालक नगर रचना प्रादेशिक योजना, सहायक संचालक नगर रचना सातारा शाखा, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी चार महिन्यांच्या आत कारण मीमांसासह सूचना व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन सातारा प्रादेशिक नियोजन मंडळाचे सदस्य सचिव, श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.खंडाळा तालुक्यात गेल्या दहा वर्षांत औद्योगिकीकरण वाढीस लागले आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांनी आपले बस्तान तालुक्यात बसवले आहे. तसेच पुण्यापासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर आणि महामार्गालगत खंडाळा असल्याने येथे औद्योगिक वसाहत आकाराला येत होती. यामुळे तालुक्यातील पडीक माळरानालाही गगनाला भिडणारे भाव मिळत होते. साहजिकच याचा परिणाम तालुक्याच्या सामाजिक जडणघडणीत झाला आहे. मात्र, शासनाच्या या नव्या धोरणानुसार पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांच्या गावठाणापासून सातशे मीटर व त्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावात एक हजार मीटरचा भाग वगळून अन्य जमिनीचे क्षेत्र उक्त प्रदेशात समाविष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचा विस्तारीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो.यामुळे तालुक्यात नवे उद्योग येण्याचा मार्ग थंडावला जाण्याची शक्यता आहे. साहजिकच या उद्योगांवर आधारलेले लघू उद्योग, कुटीर उद्योग अडचणीत येणार आहेत. याचा परिणाम कामगार वर्गावरही होणार आहे. (प्रतिनिधी)औद्योगिकीकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पडीक माळरानांना किंमत आली होती. मात्र, आता अशा उर्वरित जमिनी पिकवताही येणार नाहीत आणि त्याला विकून चांगली रक्कमही मिळू शकणार नाही. याबाबत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. औद्योगिक विकास थांबला तर तालुक्याचा विकास खुंटणार आहे.- बंडू ढमाळ, सचिव, माथाडी कामगार युनियन