रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरसह परिसरातील गावांमध्ये पारंपरिक पध्दतीने बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला.
रहिमतपूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी बेंदूर सणानिमित्त सकाळपासून गाय-बैलांना ओढ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालून आणले. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी करून विविध रंगाची बेगड लावण्यात आली. काही शेतकऱ्यांनी बैलाच्या डोक्याला बाशिंग बांधून आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली. नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला आहे. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले आहेत. काहींनी बैलांच्या शिंगांना विविधरंगी बांधलेले फुगे लक्ष वेधत होते. त्यानंतर अंगावर नक्षीदार झूल घालून बैलांना पारंपरिक पध्दतीने सजविण्यात आले. बैलांची घरी आणून पूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून शेतकरी व चिमुकल्यांनी बेंदूर उत्साहात साजरा केला.
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) परिसरातील गावात बेंदूर सणानिमित्त बैलांना घरी आणून त्यांचे पूजन करण्यात आले. (छाया जयदीप जाधव)