खंडाळा : ‘शाळेचा परिसर आनंददायी असेल तर मुलांचे शिक्षण उत्साहाने होत असते. प्राथमिक शाळेचा भौतिक दर्जा सुधारला तर विद्यार्थ्यांना शाळेचे आकर्षण वाढेल आणि त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण होईल. त्यासाठी प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असे आश्वासन खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांनी दिले.
अहिरे (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची पाहणी त्यांनी केली. यावेळी बांधकाम विभागाचे एस. आर. धायगुडे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष किरण धायगुडे, मुख्याध्यापक प्रमोद दळवी व अन्य शिक्षक उपस्थित होते.
शाळा दुरुस्तीच्या कामासाठी उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांच्या प्रयत्नातून साडेचार लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून शाळेच्या छत दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याची पाहणी करून या कामाबाबत सूचना करण्यात आल्या. कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्या, तरी त्या सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेचे आकर्षण वाटावे तसेच त्या सुरक्षित असाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे धायगुडे-पाटील यांनी सांगितले.
०५खंडाळा पाहणी
अहिरे (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांनी पाहणी केली.