शिरवळ : वीर धरणग्रस्त पुर्नवसन संघर्ष समिती, भोळी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) किर्ती नलावडे यांना पर्यायी जमीन मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी वीर धरणग्रस्तांना सर्वतोपरी मदत करीत धरणग्रस्तांबरोबर एकत्रित बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती पुनर्वसन संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. विजय शिंदे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, १९६० साली वीर धरणाची निर्मिती झाली. त्यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्याचे शासन धोरण होते. परंतु गेल्या ६० वर्षांपासून खंडाळा तालुक्यातील भोळी गावामधील निम्म्याहून अधिक शेतकरी पर्यायी जमीन मिळण्यापासून वंचित आहेत. यामुळे भोळी येथे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्रित येत वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीची स्थापना केली.
या समितीचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळवून देणे, पुनर्वसन अंतर्गत सुविधा मिळवून देणे व इतर अडचणी सोडविणे हा आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून हे निवेदन देण्यात आले. याबाबत आमदार मकरंंद पाटील यांचीही वीर धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समिती सदस्यांनी भेट घेतली.
यावेळी पुनर्वसन तहसीलदार विवेक जाधव, समिती समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष दयानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, सरपंच प्रशांत खुंटे, यशवंत चव्हाण, महादेव चव्हाण, लोणी येथील बाळासाहेब कदम, नितीन कदम व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.