सातारा : जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे नियोजन सुरू असले तरी, अनेक विघ्ने येण्याची चिन्हे आहेत. कारण, केंद्रावर मोठी गर्दी व लस कमी आल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने संवेदनशील केंद्रांवर पोलीस बंदोबस्ताचा निर्णय घेतला आहे. तसा पत्रव्यवहारही पोलीस दलाला केला आहे.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करण्यात येऊ लागले. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रात आणि खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात आली.
जिल्ह्यातील लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नियोजन केले. त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. पण, अनेकवेळा लस उपलब्धच होत नाही. त्यामुळे काही केंद्रे बंद ठेवावी लागतात. नियोजन केलेल्या तारखेला काहीवेळा लसीकरण होत नाही. त्यातच आता एक मेपासून केंद्र शासनाने १८ ते ४५ वर्षांतील व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, हा निर्णय राबवताना अनेक अडचणी पार कराव्या लागणार आहेत.
जिल्ह्यात १८ ते ४५ वर्षांतील ११ लाखांवर व्यक्ती आहेत. या लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पण, यापूर्वीचा अनुभव पाहता, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाचाही कस लागणार आहे. कारण, पाहिजे तेवढ्या प्रमाणात लस नाही. अनेकवेळा लसीसाठी वाट पाहावी लागते. तसेच आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लागतात. त्यातच १८ ते ४५ वर्षांतील नागरिकांचे लसीकरण हे अवघड ठरणारे आहे. कारण, लसीकरण केंद्रावर गर्दी वाढणार आहे. त्यातच लस उपलब्ध न झाल्यास रोष वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य केंद्रेही अपुरी पडणार आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होणार आहेत. यासाठी आता पोलीस बंदोबस्ताचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने पोलीस दलास पत्रव्यवहारही केला आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केल्यास केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तसेच काही संवेदनशील केंद्रे आहेत. अशा ठिकाणी नियंत्रणासाठी सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, असे म्हटले आहे. त्यामुळे संभाव्य समस्या टाळण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
कोट :
जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरू आहे. १ मेच्या पुढे १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होऊ शकते. अशावेळी कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच पोलीस पेट्रोलिंगही करू शकतात.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
....................................................................