सातारा : प्रवास करत असताना अनेकदा लुटमारीचे प्रकार घडत असून, चोरट्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. याला बळी न पडता प्रत्येकाने सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेकदा रस्त्यावर वाद घातला जातो. गाडीचा धक्का लागला. गाडी आडवी मारली, अशी कारणे देऊन वाद घालता जातो. मात्र, या वादात न पडता तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे हेच प्रवाशांच्या हिताचे आहे.
अनेकदा आपण रस्त्याने रात्री अपरात्री जात असताना वाटेत कुठेतरी वाद झाल्याचे दिसते. रस्त्याच्या मधोमद घोळका करून लोक उभे राहतात. आपणही नेमकं काय झालंय, हे गाडी उतरून पाहात असतो. मात्र, इथेच आपली मोठी चूक घडते. रस्त्यात वाद घालणारे हे चोरट्यांचे टोळके असते. हे जेव्हा आपल्याला समजते. तेव्हा आपल्या पायाखालची वाळू सरकते. आपल्यासह सह प्रवाशांचा ऐवज लुटून हे चोरटे पसार होतात. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी सातारा जिल्ह्यात घडत होत्या. मात्र, अलीकडे हे प्रकार कमी आले आहेत. तरीसुद्धा राज्य आणि जिल्हा मार्गावर हे प्रकार अधून मधून घडत आहेत. त्यामुळे सतर्कता हाच आपल्या प्रवासाचा सुखकार मार्ग आहे.
चाैकट : ट्रक चालकाची लूट
साताऱ्यातील वाढे फाट्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी एका ट्रक चालकाला रात्री दोनच्या सुमारास लुटण्यात आले होते. चार युवकांनी दुचाकी घासल्याची तक्रार करत ट्रक चालकाला केबीन मधून बाहेर ओढून मारहाण केली. त्यानंतर चालकाकडील दहा हजारांची रोकड आणि मोबाईल संबंधित युवकांनी चोरून नेला होता. या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी काही तासांतच संबंधित युवकांना अटक केली. त्यावेळी त्यांनी अपघाताचा बनाव केल्याची कबुली दिली. तसेच अशाप्रकारची आणखी एक घटना सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे घडली होती.
चाैकट : असे तुमच्या ही बाबतीत घडू शकते
१) समजा तुम्ही प्रवासाला निघालात. त्यावेळी वाटेत पाठीमागून चार ते पाचजण तुमच्या गाडीला हातवारे करून थांबविण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही गाडी थांबविल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी आमच्या गाडी घासली आहे. असा आरोप करतील. किंवा तुमच्या गाडीखाली एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. असं भासविण्याचा प्रयत्न करतील. संबंधित व्यक्ती तुम्हाला पोलिसांची भीती घालून पैसे मागतील. अशावेळी तुम्ही त्यांना पैसे न देता पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.
२) धावत्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, असे तुम्हाला सांगितले जाते. अशावेळी तुम्ही गाडी थांबवून टायर चेक करण्यासाठी खाली उतरता. तेव्हा संबंधित चोरटे शस्त्राचा धाक दाखवून तुमच्यासह गाडीतील प्रवाशांचेही दागिने लुटून नेऊ शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रचंड खबरदारी घेतली पाहिजे.
चाैकट : काय काळजी घ्याल...
प्रवासाला निघताना वाटेत निर्जनस्थळी कोठेही थांबू नये. काहीजण विनाकारण वाद घालत असल्याचे भासवत असतात. जेणेकरून प्रवाशांनी गाडीतून खाली उतरावे. त्यानंतर त्यांना लुटमार करणे सोपे जावे, असे त्यांचे इरादे असतात. त्यामुळे वाटेल शिवाय कोठेच गाडी थांबवू नये, ही काळजी घेतली तर आपली फसगत होणार नाही, ऐवढे मात्र, निश्चित असल्याचे पोलीस सांगतायत.