ढेबेवाडी : महाविद्यालयीन तरुणी भाग्यश्री माने हिचा गुप्तधनाच्या आमिषापोटीच बळी दिल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील नऊजणांच्या हत्येच्या घटनेमुळेच साडेतीन वर्षांपूर्वी घडलेल्या भाग्यश्रीच्या खुनाचा गुन्हा उघड झाला.आजीने तुला आईकडे घेऊन जातो म्हणून बाहेर आणले. त्यानंतर तिला ऊसाच्या शेतात नेहून खून करताना तिचे दोन्ही पाय धरले, देवऋषीने तोंड दाबले आणि मांत्रिकाने गळा चिरला. या घटनेत अजून काही नातेवाइकांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.करपेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने (वय १८) ही महाविद्यालयीन तरुणी २१ जानेवारी २०१९ रोजी काॅलेजला गेली होती. मात्र, पुन्हा ती घरी आलीच नाही. त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी २२ जानेवारी रोजी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास केला असता गावाशेजारून तळमावलेकडे जाणाऱ्या पाऊलवाटेशेजारच्या उसाच्या शेतात भाग्यश्रीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर ही हत्या अंधश्रद्धेतूनच झाल्याचा पोलिसांना संशय आल्याने विविध पातळ्यांवर तपास करत काही मांत्रिक आणि नातेवाइकांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. तरीही पोलिसांनी तपासात सातत्य ठेवले होते. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील दोन कुटुंबांतील नऊजणांच्या गुप्तधनापोटी झालेल्या हत्येच्या तपासात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मौलाना आब्बास बागवान (रा. सोलापूर) याच्या संपर्कात करपेवाडी घटनेतील संशयित आरोपी गुन्ह्याच्या कालावधीत असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर भाग्यश्रीच्या खुनातील मुख्य संशयित विकास राठोड (वय ३३, रा. नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मुळेतांडा, ता. दक्षिण सोलापूर), फुलसिंग सेवू राठोड (४८, ऐनापूर तांडा, ता. जि. विजयपूर, कर्नाटक), आजी रंजना लक्ष्मण साळुंखे (६७, करपेवाडी), देवऋषी कमल आनंदा महापुरे (५९, रा. खळे, ता. पाटण) या चौघांना अटक करण्यात आली आहे.असा झाला उलगडा...म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या संपर्कात भाग्यश्रीच्या गुन्ह्यातील संशयितांचे गुन्ह्याच्या कालावधीत अनेकदा संपर्क झाला होता. त्याची तांत्रिक माहिती मिळाल्यानेच पोलिसांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. तत्पूर्वी या संशयितांना ताब्यात घेऊनही पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी झाले होते.
सातारा: गुप्तधनाच्या अमिषापोटीच भाग्यश्रीचा बळी; आजीने धरले पाय, अन् मांत्रिकाने चिरला गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:05 PM