हळदीला भाव
सातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला यंदा सोन्यासारखा दर मिळत आहे. बाजारपेठेत वाढलेल्या मागणीमुळे अनेक वर्षांनंतर हळदीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून कष्टाचे चीज होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कमी कालावधीत चांगले पैसे मिळत असल्याने शेतकरी हळदीकडे वळला आहे.
अतिक्रमणे वाढली
सातारा : बसस्थानक ते भूविकास बँक या मार्गावरील परिसरातील रस्त्यावर दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. दुकानासमोरील रस्त्यावर अतिक्रमण करून छावण्या मारल्या जात असून, त्यामध्ये दुकानातील साहित्य लावण्यात येत आहे. या मार्गावर मोठी गर्दी होत आहेत.
रस्त्याची चाळण
सातारा : सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीत समावेश होऊनही शाहूपुरीकर अद्यापही विकास कामांपासून वंचित आहेत. त्यामुळे गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावर रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : शहरातील काही अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. साताऱ्यातील शाहू चौक ते बोगदा हा रस्ता अरुंद आहे. या मार्गावरून कास, बामणोली, परळी, सज्जनगड या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरी वस्ती असल्याने स्थानिक रहिवाशांची वाहने रस्त्याकडेला पार्क करतात.
कोबी झाला स्वस्त
सातारा : कमी कालावधीत जादा पैसा मिळतात, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाल्याच्या पिकाकडे वळले आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.
आरोग्याचा प्रश्न
सातारा : गरिबांचा आधारवड असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागास याबाबत पत्रव्यवहार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
डिस्टन्सिंगचा फज्जा
सातारा : कोरोना व लोकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर बेरोजगारी ओढवली होती. ग्रामीण भागात एसटीच्या ठराविक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.