पेट्री : परळी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या धावली येथील आरोग्य उपकेंद्राद्वारे सोमवारी भांबवली, तांबी येथील नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एकाचा अहवाल बाधित आला नाही. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना चाचणी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी रोहिणी सुर्वे, आरोग्य सेविका गीतांजली नलवडे यांनी ग्रामस्तरीय समितीच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले होते. या कोरोना शिबिरात भांबवली येथील ३५ व तांबी येथील २५ अशा साठ नागरिकांच्या रॅट टेस्ट केल्या. सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
यावेळी पोलीस पाटील शीतल सागवेकर, अंगणवाडी सेविका विमल सपकाळ, सुरेखा जाधव यांनी मदत केली. भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा पहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे गावात कोरोनाबाबत धाकधूक होती. आरोग्य सेविका गीतांजली नलवडे यांनी तत्काळ गावात कॅम्प लावून तपासणी केली.