खटाव : जिल्हा प्रशासनाने दिनांक २५ मे ते १ जून या कालावधीत संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाबरोबरच स्थानिक दक्षता कमिटी व भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे.
संचारदंबीच्या पहिल्याच दिवशी पंचायत समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने दक्षता कमिटी सदस्य, तसेच पोलिसांच्या मदतीने गाव परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने घालून दिलेल्या कडक निर्बंधांचे पालन करून सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, तसेच नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी भरारी पथकाने केले.
यावेळी भरारी पथकाचे प्रमुख कृषी विस्तार अधिकारी अप्पासाहेब गौंड, उपसरपंच अमर देशमुख, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडगे, प्रमोद शेलार, पोलीस हवालदार विलास घोरपडे, वैभव शिंदे, नितीन जाधव, नौशाद काझी, सुनील पाटोळे आदी उपस्थित होते.
फोटो : २५ खटाव भरारी पथक
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खटावमध्ये भरारी पथक, दक्षता कमिटी सदस्य व पोलीस प्रशासनाने गावातील संचारबंदीचा आढावा घेतला. (छाया : नम्रता भोसले)