कराड- देशात सध्या भयानक स्थिती आहे. समस्या केवळ सरकारबद्दलची नाही किंबहुना लोकशाहीवरच संकट नाही तर घटना आणि संपुर्ण देशावर संकट आहे. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज होती. तो आवाज राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे बुलंद होईल. ही भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल, असा विश्वास स्वराज्य इंडिया पार्टीचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला.कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. यावेळी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.
योगेंद्र यादव म्हणाले , दिल्लीत एक मंत्री डॉ. बाबासाहेबांची शपथ घेतो. त्याच्या विरोधात भाजप देशभर आंदोलन करते आणि आम आदमी पार्टी त्याला पक्षातून काढून टाकते. आज त्याच पध्दतीने हिंदुत्वाच्या आडून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. खरंतर हे महाराष्ट्रात येऊन सांगण्याची गरज नाही. कारण, महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर कसे सरकार बनले आहे तो गुवाहाटीवाला ड्रामा संपुर्ण देशाने पाहिला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता कशी संपवून टाकली आहे. तथाकथित धर्म संसदेच्या नावावर एखाद्या समुदायाच्या लोकांना मारण्याचे खुले आवाहन केले जात आहे. गुन्हा नोंद होत नाही आणि कोणाला तुरूंगातही जावे लागत नाही. हे सर्व सत्तेच्या आशिर्वादाने होते, असा आरोपही त्यांनी केला.
संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांकडून देश तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशापुढील एवढ्या मोठ्या संकटाचे समाधान संसदेकडून होऊ शकत नाही. कारण संसदच या समस्यांचा हिस्सा बनली आहे. दुर्देवाने या संकटाचे समाधान कोर्ट-कचेरी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनही होत नाही. लोकशाहीच्या इतिहासात ज्यावेळी असे प्रसंग आले आहेत. त्यावेळी जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज तेच काम भारत जोडो यात्रा करत आहे. या पदयात्रेने देशासमोरील बेरोजगारी, गरिबी, महागाई, वाढती अर्थिक विषमता यासारखे मुद्दे जनतेसमोर आणले असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.
देशातील सुडाच्या राजकारणाविरोधात भारत जोडो यात्रा उभी राहिली आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांनी जुने मतभेद बाजूला ठेऊन या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून योगेंद्र यादव म्हणाले, माझ्या घरात आग लागलेली असेल तेव्हा मला दोनच पक्ष दिसतात. एक पेट्रोलची बाटली घेऊन फिरणारा आणि दुसरा पाण्याची बादली घेऊन पळणारा, आज जो पाण्याची बादली उचलेल तो माझा मित्र, भाऊ आहे. आम्ही त्याच्या बरोर काम करू. याच संकल्पनेने आम्ही भारत जोडो यात्रेत सामील झालो आहोत.