लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : ‘सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही, त्यामुळे आम्ही या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून पुढील लढ्याला सुरुवात करणार आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी जाहीर केले.
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात कुठलाही लढा चालू असला तरी सत्तेत असलेले व नवीन गेलेल्यांत मंत्रिपदासाठी प्रचंड चढाओढ सुरू आहे. राज्याच्या इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण एवढ्या निंदनीय थराला कधीच गेले नव्हते, इतके भयंकर कधी घडले नव्हते, गेल्या चार दिवसांत राजकारणी इकडून तिकडे पक्ष बदलत आहेत. जनतेशी त्यांना देणे घेणे नाही, असे दिसते आहे. अशा परिस्थितीमुळे दि. १९ जुलैपासून सुरू होणारे धरणग्रस्तांचे उपोषण दहा दिवस पुढे ढकलून येत्या २७ जुलैपासून कोयना जलाशयाच्या काठावर कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार असून, त्यास व्यापक स्वरूप देणार आहे. या उपोषणास कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या प्रकल्पातील सुमारे दोन हजार धरणग्रस्त सहभागी होणार आहेत.
कोयना धरण उच्चस्तरीय समितीच्या बैठकीच्या अगोदरच जमिनी पसंती सांगली व सातारा जिल्ह्यांत झाल्या आहेत, अशा सुमारे आठशेच्या दरम्यान खातेदारांनी अर्ज केले आहेत, त्याचे पुढे काय करणार? असा सवाल डॉ पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेस श्रमुदचे संतोष गोटल, सचिन कदम, सीताराम पवार, प्रवीण साळुंखे, परशुराम शिर्के, शिवाजी कांबळे, किसन सुतार, अनिल देवरुखकर, विठ्ठल पवार, तानाजी बेबले, आनंदा सपकाळ, गुलाब काटे, रमेश शिंदे, बाजीराव पन्हाळकर, दादू थोरवडे, विनायक शेलार, गंगाराम झोरे, कमल कदम, लक्ष्मण शेलार, जयवंत लाड, साधू सपकाळ, बळीराम लांबोर, संतोष कदम, आनंदा साळुंखे, अशोक माने, सुरेश थोरवडे यांच्यासह धरणग्रस्त उपस्थित होते.
आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?कोयनेतील आंदोलनादरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील या लोकप्रतिनिधींना भेटावयास वेळ मिळाला नाही, जे आले त्यांनी फक्त भेटी दिल्या, मग आम्ही तुमच्यासोबत कसे वागायचे ते सांगा? आम्ही मरायला लागलो तरी तुम्ही येणार नाही का?, का तुम्ही निमंत्रणाशिवाय येणार नाही, अशी खंत डॉ. पाटणकर यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.