अजय जाधव-- उंब्रज--गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय कऱ्हाड तालुक्यातील भवानवाडी या गावाने दिला. पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या सार्वजनिक विहिरीची त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षांत प्रथमच स्वच्छता झाली. गावच्या युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या सत्कृत्यामुळे गावच्या पाण्याची चवही बदलली!भवानवाडी गावाशेजारून उत्तरमांड नदी वाहते. या नदीच्या शेजारीच गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर आहे. सुमारे पस्तीस वर्षे या विहिरीतून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. दररोज उपसा असला तरी विहिरीतील गाळ, इतर घाण दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आजारांचे प्रमाणही वाढत होते. यावर तोडगा काढताना गावातील गट-तट विसरून सर्व युवक एकत्र आले. सर्वांच्या सहभागातून गावविहिरीची स्वच्छता करण्याचे ठरले.सुमारे तीस फूट खोल असलेल्या या विहिरीतील पाणी इंजिनाच्या साह्याने उपसण्यात आले. यानंतर तरुण विहिरीत उतरले. बादली व इतर साहित्याच्या मदतीने सुमारे पाच फूट उंचीपर्यंत साचलेला गाळ आणि इतर टाकाऊ पदार्थ या विहिरीतून अथक परिश्रम करून बाहेर काढण्यात आला व विहीर पूर्ण स्वच्छ झाली. या स्वच्छता मोहिमेनंतर चारच तासांत विहीर पाण्याने पुन्हा भरली. युवकांनी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले. विहिरीतील गाळ व घाण काढल्यामुळे पाण्याची ‘चव’च बदलली आहे. यामुळे आता विहिरीचे पाणी पिताना ग्रामस्थही गावातील तरुणांचे ‘चवी’ने कौतुक करत आहेत. गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावविहिरीची सुमारे पस्तीस वर्षे स्वच्छताच करण्यात आली नव्हती. आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन सहभागातून विहिरीची स्वच्छता केली. यामुळे विहिरीतील पाणीसाठा तर वाढला आहेच; शिवाय पाण्याची चवही बदलली आहे. - रवींद्र थोरात, ग्रामपंचायत सदस्य, भवानवाडी
भवानवाडीच्या पाण्याची ‘चव’च बदलली!
By admin | Published: December 04, 2015 9:59 PM