नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे...फक्त भिजव पांडुरंगा तहानलेलं रान रे...कमरेवरचा हात काढून आभाळाला लाव तू...ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू...कऱ्हाड : विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वैष्णव पंढरीच्या वाटेवर आहेत. सोमवारी आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरेल. भक्तिसरात चिंब न्हालेले वारकरी विठू माउलीचं रूप आपल्या डोळ्यात साठवतील. ‘विठ्ठल... विठ्ठल’चा जयघोष करतील आणि पावसासाठी विठुरायाला साकडंही घालतील. विठुनामाच्या या घोषातच ठिकठिकाणच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील टाळ-मृदंगाचा गजरही सामावून जाईल. कऱ्हाड शहर व परिसरात अनेक ठिकाणी विठ्ठल-रखुमाईची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये सध्या आषाढी एकादशीची तयारी सुरू आहे. कऱ्हाडात महिला महाविद्यालयानजीक असलेले संत सखुबाईचे मंदिर, मारुतीबुवा कऱ्हाडकर मठ, संत रोहिदास चौक, ऊर्दू हायस्कूलनजीक तसेच अन्य काही ठिकाणी विठ्ठल-रखुमाई मंदिरे आहेत. मलकापुरमध्येही कोयना वसाहतीत विठ्ठल मंदिर असून, या सर्व मंदिरांमध्ये रविवारी आषाढी एकादशीची जय्यत तयारी केली जात होती. मंदिरांसमोर मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच गर्दी होण्याची शक्यता असणाऱ्या मंदिरांमध्ये सुरक्षा रेलिंगही लावण्यात आले आहेत. काही मंदिरांमध्ये महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लावण्यासाठी रेलिंग उभे करण्यात आले आहे. शहरातील सर्वच विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भजन, हरिपाठ, अभंग, वीणावादन, भजनी मंडळांचे कार्यक्रम तसेच काही मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. संत सखुबाई मंदिरात आषाढी एकादशिनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. संत सखुबाई मंदिर हे कऱ्हाडातील प्रसिद्ध मंदिर आहे. सासुरवासीन सखूसाठी विठ्ठलाने आषाढी एकादशीदिवशी स्वत:ला तिच्याजागी बांधून घेतले व सखूला पंढरपूरला पाठविले, अशी अख्यायिका आहे. त्यावरून चित्रपटांची निर्मितीही झाली आहे. (प्रतिनिधी) संत रोहिदास चौक, गुरुवार पेठसंत रोहिदास चौकातील विठ्ठल-रखुमाई हे मंदिर १९३९ मध्ये दिवंगत गौराबाई नामदेव शिंदे यांनी स्थापन केले. पूर्वी छोटे असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार १९७९ ते १९८१ या कालावधीत करण्यात आला. पंढरपूरमध्ये असलेल्या विठ्ठल- रखुमाई मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती या मंदिरात ठेवण्यात आली आहे. आषाढी एकादशीदिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.उर्दू शाळेपाठीमागे, शनिवार पेठशहरातील ऊर्दू शाळेपाठीमागे असलेल्या विठ्ठल मंदिराची स्थापना ६ जून १९८१ मध्ये भा. म. पागनीस गुरुजी यांनी केली. १० नोव्हेंबर १९७९ मध्ये या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. अतिशय लहान आकारातील बांधण्यात आलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत सखूबाई मंदिर, मंगळवार पेठछत्रपती शाहू महाराजांनी कृष्णाकाठी विठ्ठल मंदिर बांधून दिले आहे. त्याकाळी या मंदिराची देखभालीची जबाबदारी शाहू महाराजांनी केसरकर यांच्यावर दिली. केसरकर यांच्या तिसऱ्या मुलीची मुलगी ही संत सखूबाई होय. आषाढी एकादशीला संत सखूबाईला वारीतून जाण्याची इच्छा झाली. त्यावेळी तीला सासरच्यांनी घरात बंद करून डांबून ठेवले. शेवटी पांडुरंगाने संत सखूबाईची भक्ती पाहत तिला पंढपूरात आणले व स्वत: संत सखूबाईचे रूप घेवून या ठिकाणी कोंडून घेतले, अशी आख्यायिका सांगितली जाते. उर्दू शाळेपाठीमागे, शनिवार पेठशहरातील ऊर्दू शाळेपाठीमागे असलेल्या विठ्ठल मंदिराची स्थापना ६ जून १९८१ मध्ये भा. म. पागनीस गुरुजी यांनी केली. १० नोव्हेंबर १९७९ मध्ये या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. अतिशय लहान आकारातील बांधण्यात आलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भिजव पांडुरंगा तहानलेलं रान रे..!-- एकादशी विशेष
By admin | Published: July 26, 2015 9:52 PM