कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांना अभूतपूर्व यश मिळाले. पण या निकालाने डॉ. भोसले यांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. तसेच विरोधकांची व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची काळजीही तितकीच वाढली आहे.
कारखाना निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. डॉ. भोसले यांच्या सहकार पॅनलचा विजय निश्चितच होता. पण या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला मिळालेल्या मताधिक्याने आजवरच्या कृष्णा कारखाना निवडणुकीतील सारे विक्रम मोडीत काढत नवा विक्रम केला आहे. आजवर अडीच ते साडेतीन हजारांच्या फरकाने पॅनल विजय मिळवत आली आहेत. यंदा मात्र अकरा हजार दरम्यानच्या मताधिक्क्याने विजय मिळाल्याने कार्यक्षेत्रात प्रचारासाठी चकरा मारणाऱ्यांना चपराक बसली आहे.
वास्तविक डॉ. सुरेश भोसले यांना यापूर्वी दोनवेळा कारखान्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. लोकरी मावा व कोरोना संकट यामुळे त्यांना प्रत्येकी सहा वर्षे काम करता आले आहे. दिवंगत जयवंतराव भोसले यांच्यानंतर जास्त काळ अध्यक्षपद भूषविणारे डॉ. सुरेश भोसले हेच एकमेव आहेत. सहा वर्षांत त्यांनी केलेला कारभार, सभासदांशी राखलेला सुसंवाद, कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेली रुग्णसेवा यामुळे डॉ. सुरेश भोसले यांची प्रतिमा उजळून निघाली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच झालेला दिसतो.
डॉ. अतुल भोसले हे भाजपचे नेते असल्याने या निवडणुकीत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. महाविकास आघाडीने पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. शिवाय दोन माजी अध्यक्ष मोहिते मनोमिलनाच्या चर्चेत गुंतले होते. त्यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी पायाला भिंगरी लावून प्रचारात आघाडी घेतली. त्यांनी मांडलेले मुद्दे सभासदांच्या पचनी पडल्यानेच विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळालेले दिसतात. पण या ऐतिहासिक विजयामुळे डॉ. भोसले परिवाराची जबाबदारी वाढली आहे. लोकांच्या त्यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत. त्या त्यांनी व्यवस्थित पूर्ण केल्या तर भविष्यातील त्यांची वाटचाल सुकर व्हायला हरकत नाही.
दुसरीकडे त्यांच्या विरोधकांचीही काळजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पॅनलला मिळालेली मते त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. त्याबरोबरच या दोघांना पाठीशी घालणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील यांचीही काळजी निश्चितच वाढली आहे. आगामी जिल्हा बँक व बाजार समिती निवडणुकीत बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांची पहिली परीक्षा होणार आहे. त्याचा निकाल औचित्याचा असणार आहे.
चौकट
‘सहकार’ला ५८ टक्के मतदान
या निवडणुकीत डॉ. भोसले यांच्या सहकार पॅनलला ५८ टक्के मतदान मिळाले आहे. विरोधी अविनाश मोहिते यांच्या पॅनलला २७ तर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पॅनलला १२ टक्के मतदान झाले. विरोधी पॅनलला मिळालेल्या मतांची बेरीजही फक्त ३९ टक्के होते. त्यामुळे येथे फक्त डॉ. भोसले यांची जादू चालल्याचे स्पष्ट होते.
चौकट
उंडाळकर तिकडे गुलाल; समीकरण बिघडले
‘कृष्णा’च्या निवडणुकीत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. ‘उंडाळकर तिकडे गुलाल’ हे समीकरण अनेक वर्ष पाहायला मिळाले. पण त्यांच्या निधनानंतर ‘कृष्णा’च्या पहिल्याच निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील यांना हे समीकरण कायम राखता आले नाही.
चौकट
अतुल भोसले प्रचारात, विनायक भोसले कार्यालयात!
निवडणुकीत डाॅ. सुरेश भोसले यांना त्यांच्या दोन्ही मुलांची खूप मोठी मदत झाली. डॉ. सुरेश भोसले यांच्याप्रमाणेच डॉ. अतुल भोसले यांनी कार्यक्षेत्रातील १३२ गावांमध्ये जाऊन बैठका घेतल्या. त्याला लोकांचा प्रतिसाद मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट होते. पण त्याचवेळी कार्यालयात बसून विनायक भोसले यांनी हाताळलेली प्रचार यंत्रणा नजरेआड करता येणार नाही.
चौकट
मंत्री कदमांचे प्रयत्न तोकडे
कारखाना निवडणुकीत सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सक्रिय होत रान तापवले. भारती विद्यापीठाची टीमही प्रचारात उतरली होती. डाॅ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलला त्यामुळे बळ मिळाले. पण निवडणूक निकाल पाहिल्यानंतर मंत्री कदमांचे प्रयत्न तोकडे पडल्याचे चित्र दिसते.
फोटो
डाॅ. सुरेश भोसले
डाॅ. अतुल भोसले
आ. पृथ्वीराज चव्हाण
ॲड. उदयसिंह पाटील