कऱ्हाड : तालुक्यातील भोसलेवाडी येथे १८ सप्टेंबर २००५ रोजी पूर्ववैमनस्य व राजकीय वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी झाली होती. मारामारीदरम्यान एकाचा खूनही झाला होता. येथील जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी या खटल्याचा निकाल लागला. न्या. एम. आर. देशपांडे यांनी खूनप्रकरणात एकास दोषी धरून जन्मठेप, तर दोन्ही गटांतील एकूण सोळाजणांना कारावासाची शिक्षा सुनावली. सतीश वसंत भोसले (रा. भोसलेवाडी) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सतीश भोसले याच्यासह रमेश हिंदुराव भोसले, मोहन बोधलेबुवा भोसले, प्रदीप बाळकृष्ण भोसले, सचिन कल्याण भोसले, सुरेश प्रल्हाद भोसले यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा व शिवाजी शंकर भोसले, सागर शशिकांत भोसले, गणेश बाळू भोसले, अशोक परशराम भोसले, गणेश शशिकांत भोसले, सचिन संभाजी भोसले, निशांत भगवान भोसले, रंगराव रामचंद्र भोसले, विशाल संताजी भोसले, चंद्रकांत दिनकर भोसले यांना तीन वर्षे कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. कऱ्हाड तालुक्यातील भोसलेवाडी येथे पूर्ववैमनस्य, राजकीय वाद व गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून १८ सप्टेंबर २००५ रोजी दोन गटांत मारामारी झाली होती. दोन्ही गटांतील युवकांनी एकमेकांना लाकडी दांडके व गजाने मारहाण केली होती. याबाबत उंब्रज पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. भगवान शंकर भोसले याने उंब्रज पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सतीश भोसले याच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सतीश भोसले याच्यासह त्याच्या साथीदारांनी काठी व गजाने मारहाण करून संजय आनंदराव भोसले यांचा खून केल्याचे व चंद्रकांत दिनकर भोसले यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या उलट सचिन कल्याण भोसले याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी शंकर भोसले याच्यासह त्याच्या दहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी राजकीय वाद, पूर्ववैमनस्य व मिरवणुकीदरम्यानच्या वादातून दांडके तसेच गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या दोन्ही प्रकरणांचा तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी केला. दोन्ही गटांतील आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. खटल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर न्या. एम. आर. देशपांडे यांनी एकास खूनप्रकरणी जन्मठेप तर पंधराजणांना कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी सहायक पोलीस फौजदार अरुण नलवडे व आर. के. पटेल यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. (प्रतिनिधी)
भोसलेवाडी खूनप्रकरणी एका आरोपीस जन्मठेप
By admin | Published: March 27, 2015 12:24 AM