कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. एकंदरीत निकाल पाहता दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांची सरशी पहायला मिळत आहे. तर उत्तरेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील समर्थकांचा करिष्मा कायम आहे. मात्र, काही ग्रामपंचायतीत झालेले सत्तांतर बाळासाहेबांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला होता. त्यातील १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर पाच ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. उर्वरित ८७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी शांततेत मतदान झाले. उमेदवारांचे नशिब मशिनबंद झाले होते. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला.
दक्षिण विधानसभा मतदार संघात ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्याचे निकाल सोमवारी समोर आले. त्यामध्ये भाजपच्या डॉ. अतुल भोसले समर्थकांनी सरशी मारल्याचे स्पष्ट दिसते. खुबी, शेरे, नांदगाव, शेणोली, भैरवनाथनगर, काले, कार्वे, शिंदेवाडी, विंग, गोळेश्वर, कालवडे, जिंती, चचेगाव, धोंडेवाडी, मुंढे, कोडोली, वाठार या गावात भाजपने सत्ता मिळवली. तर बेलवडे बुद्रूक येथे भाजप व अॅड. उदयसिंह पाटील गट एकत्रित येऊन सत्ता मिळवली. खोडशीत डॉ. अतुल भोसले व मंत्री बाळासाहेब पाटील समर्थकांनी एकत्रीत येऊन सत्ता मिळविली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या मनोमिलनाचा तितक्या प्रमाणात प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकांत पहायला मिळाला नाही. शिवाय स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोयीच्या आघाड्यांना प्राधान्य दिल्याचेही दिसून आले.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा करिष्मा कायम असल्याचे निकालावरून दिसले. अनेक गावात राष्ट्रवादी अंतर्गतच दोन गटात लढत झाली. मतदार संघातील मोठ्या असणाऱ्या उंब्रजची सत्ता मंत्री पाटील यांनी कायम ठेवली. तसेच अनेक ग्रामपंचायतीमधील सत्ता त्यांच्या समर्थकांनी कायम ठेवल्या आहेत. मात्र, पाल, चोरे, पार्ले, बनवडी, कोणेगाव या ग्रामपंचायतीत बाळासाहेब पाटील समर्थकांना सत्ता राखता आली नाही. ही बाब त्यांच्यासह कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
- चौकट
... या गावात झालंय सत्तांतर
करवडी, नांदगाव, वहागाव, बेलवडे हवेली, वडोली निळेश्वर, शिंदेवाडी, बनवडी, कोणेगाव, रिसवड, तांबवे आदी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आहे.
फोटो : १८अतुल भोसले
फोटो : १८बाळासाहेब पाटील