पाचवड : भुईंज ते किसन वीर कारखाना रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मोठे झाड पडल्याने वाहतूक खंडित झाली आहे. तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड रस्त्याच्या कडेला काढून वाहतूक सुरळीत केली.
भुईंज व पाचवड परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुईंज ते किसन वीर कारखाना या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे भले मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ खंडित झाली. किसन वीर कारखाना व वाई तालुक्याच्या पूर्व भागातील असलेली गावाची वाहतूकही खंडित झाली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीपाद जाधव यांना मिळताच त्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून पडलेले झाड काढले. यामुळे वाहतूक सुरळीत केली. हे मदतकार्य सलग तीन ते चार तास सुरू होते. यादरम्यान भुईंज ते चिंधवलीमार्गे असलेल्या रस्त्यावरून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.