कऱ्हाड : शेवाळेवाडी (म्हासोली) ता. कऱ्हाड येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ गुरुवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड यांनी दिली.
विलासराव पाटील-उंडाळकर यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राजकीय, सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम केले आहे. सलग ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे नेतृत्व करताना राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार खात्यासह विविध खात्याचे काम पाहिले होते. सातारा जिल्हा बँक त्याच्याच मार्गदर्शनाखाली देशात आदर्श बँक म्हणून नावारूपास आली. रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना करताना कऱ्हाड तालुक्यातील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या संस्था आज ही सहकारात आदर्शवत असे कामकाज युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विलासराव पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाच्या स्मृती कायमस्वरूपी चिरंतन राहाव्यात, या हेतूतून रयत कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेत कारखाना कार्यस्थळावर पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गुरुवारी सकाळी विलासराव पाटील यांच्याबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या हस्ते पुतळ्याचे भूमिपूजन केले जाणार असून, यावेळी सातारा जिल्हा, कऱ्हाड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कोरोनाचे नियम पाळून सर्व कार्यकर्ते, सभासद यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आप्पासाहेब गरुड यांनी केले आहे.