सुर्यकांत निंबाळकरआदर्की : पर्यावरणाचा ऱ्हास व कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता होती यांचा विचार करुन बिबी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा १३०० नाराळाची रोपे लावून जगवली. उन्हाच्या तिव्रतेने त्यांना हानी पोहचू नये म्हणून उसाच्या पाचटीचे आच्छादन टाकल्याने व टॅकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार झाली आहेत.बिबी ता. फलटण येथील तरूण व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आठ महिन्यापूर्वी बिबी फाटा ते बिबी गाव, शाळा परिसर, बाजार तळ, वाघजाईनगर, महादेव मंदिर परिसर, बिबी-कोराळे रस्ता आदी ठिकाणी खड्डे खोदुन श्रमदानात नारळाची रोपे लावली. प्रारंभी टँकरने पाणी घालुन रोपे जगवली. त्यानंतर तीन किलोमीटर ठिंबक पाईप टाकून कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्याने रोपे हिरवीगार दिसत होती.परंतू, कडक उन्हामुळे रोपे सुकू लागली होती. म्हणुन सर्व रोपांभोवती उसाच्या पाचटीचे आच्छादन घातल्याने जमिनीची होणारी धूप थांबून टँकरद्वारे घातलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबले आहे. यामुळे झाडाच्या बुध्यामध्ये ओलावा टिकणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान व लोकवर्गणी दिली. पावसाळ्यात रोपे हिरवीगार दिसत होती परंतु उन्हाळ्यामुळे झाडांना इजा पोहोचू नये म्हणून पाचटीचे आच्छादन केले आहे.यावेळी संजय बोबडे, अमोल बोबडे, हृषीकेश बोबडे, प्रमोद बोबडे, मंगल बोबडे, विशाल बोबडे, रावसाहेब बोबडे उपस्थित होते.
गावातील तरुण, ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिबी-फाटा ते बिबी गाव इतर ठिकाणी नारळाची रोपे लावून त्याला ठिंबकव्दारे पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी दिली आहे. पाचटीचे आच्छदन टाकल्याने ओल टिकून राहिली ने झाडे हिरवीगार दिसत आहेत. - विशाल बोबडे, ग्रामपंचायत सदस्य बिबी ता . फलटण