आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यातील मलवडी-बिबी-आळजापूर रस्त्यावरील बिबी येथील चौकात लावलेला दिशादर्शक वेड्याबाभळीच्या झाडात झाकोळल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. संबंधित विभागाने झाडाच्या फांद्या तोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
फलटण पश्चिम तालुक्यातील ग्रामीण खेडी मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री सडक योजनेतून अंदाजे साडेपाच कोटी रुपये खर्चून आळजापूर-बिबी-मलवडी रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत पूर्णत्वाकडे नेण्यात आले. पण संबंधित विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. मार्गदर्शक फलक काढून इतरत्र फेकले आहेत.
बिबी येथील मुख्य चौकात दिशादर्शक लावला आहे. पण तो वेड्याबाभळीच्या फांद्यांनी झाकोळल्यामुळे मलवडी, आळजापूर, बिबी, वाघोशी, बिबी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनधारकास फलक दिसत नसल्याने फसगत होत आहे. तरी संबंधित विभागाने फांद्या तोडून फलक मोकळा करण्याची मागणी होत आहे.
१२बिबी
फोटो -बिबी (ता. फलटण) येथील दिशादर्शक फलक झाडाच्या फांद्यांमुळे दिसत नाही. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)