आॅनलाईन लोकमतआदर्की , जि. सातारा, दि. १0 : बिबी, ता. फलटण येथे गेल्या चाळीस वर्षांपासून कीर्तनकाराच्या हस्ते एका कीर्तन श्रोत्यास ग्रंथ भेट देऊन माउली आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. तरुणांमध्ये आध्यात्माची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने मारुती देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.बिबी गावात स्वयंभू हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी रामनवमी व हनुमान जयंतीनिमित्त पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गावात निवृत्त शिक्षक, विविध खात्यांचे निवृत्त कर्मचारी, शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्याबरोबर विविध क्षेत्रांत राज्य, विदेशातही मोठ्या प्रमाणात चाकरमनी आहेत.गावात ४० वर्ष पारायण सोहळ्यात सायंकाळी कीर्तनासाठी महिला, पुरुष, तरुण एकत्र येतात. मान्यवर कीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व श्रोत्यांमधून एका नावाची चिठ्ठी काढण्यात येते. यानंतर संबंधित व्यक्तिला कीर्तनकाराच्या हस्ते माउलीची प्रतिमा व ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात येतो.शाळकरी व तरुण मंडळांना हरिपाठाची आवड व आध्यात्माची ओढ लागावी म्हणून ज्या तरुणाचे हरिपाठ तोंड पाठ आहे त्यास मान्यवरांच्या हस्ते हरिपाठाचे पुस्तक भेट देण्यात येते. या उपक्रमामुळे तरुण मोठ्या प्रमाणात आध्यात्माकडे वळत असल्याने देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. (वार्ताहर)पारायण काळात उपस्थित कीर्तन श्रोत्यांमधून भाग्यवान श्रोता म्हणून कीर्तनकारांच्या शुभहस्ते माउलीची प्रतिमा किंवा ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम माउली आपल्या घरी सुरू असून, हरिपाठ पाठ असणाऱ्या मुलांना तोंडपाठ हरिपाठ उपक्रमात हरिपाठ पुस्तक देऊन लहान मुलांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यामुळे लहान मुले व युवक पारायण काळात सक्रिय राहतात. - विजय बोबडे, गुरुजी
बिबीत माउली आपल्या दारी
By admin | Published: April 10, 2017 2:36 PM