एकेकाळी श्रीमंतीचे प्रतीक असलेली सायकल मधल्या काळात कालबाह्य होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे आता पुन्हा एकदा हीच सायकल चर्चेत आली आहे. अनेकांनी पुन्हा सायकलचा वापर सुरू केला आहे.
सायकल पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्याने जुना काळ डोळ्यासमोर तरळू लागला आहे. सायकल वापरणारे अनेक शौकीन पूर्वी पाहायला मिळायचे. अनेकांचं सायकलवर इतकं प्रेम की, बाजारातील अनेक वस्तू या सायकलला लागलेल्या पाहायला मिळायच्या. आपली सायकल इतर सायकलच्या तुलनेत कशी देखणी, सुंदर आणि उठावदार दिसेल यावर अनेकांचा भर असायचा. त्यातूनच सायकलींची सजावट केली जायची. सायकल जशी लोकांची गरज होती, तशीच ती अनेकांची प्रेस्टिज पॉईंट देखील होती.
शौकिन मंडळी सायकलला अनेक अफलातून ॲक्सेसरीज लावत असत. सायकल अंधारातही वापरण्यासाठी सायकलला खास डायनामा लाईटची सोय असायची. सायकलच्या मागच्या चाकातून ऊर्जानिर्मिती करायची आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रकाशाच्या आधारावर अंधारातूनदेखील सहजरित्या प्रवास केला जायचा. हँडलच्या मुठीला विशिष्ट रबर लावले जायचे. चाकांच्या स्पोक्समध्ये मणी व रिफ्लेक्टर बसवले जायचे. दुचाकीला जसे आरसे असतात तसे आरसे सायकललाही पाहायला मिळायचे. सायकलच्या मडगार्डला खालच्या बाजूस चिखल उडू नये म्हणून मोठे रबर लावले जायचे. त्या रबरवर मुलांची नावे अथवा चित्रपटांची नावे लिहिली जायची. चेनच्या वर जे कव्हर असते त्यावर पेंटरकडून नाव लिहिले जायचे. अनेकजण भांड्यावर नाव कोरण्याच्या मशीनद्वारे हँडलवर नाव कोरत असत. वडील कुठे बाहेरगावी सायकल घेऊन निघाले की, मुले अनेकदा त्यांच्या मागे लागायची. त्या मुलांना बसता यावे यासाठी हँडलच्या खालच्या नळीवर लहान सीट बसवली जायची. सायकलचे कॅरियर तर इतके मजबूत असायचे की, त्यावर दहा - बारा गवताच्या पेंड्या बांधून आणल्या जायच्या. ओझ्यासाठी सायकल वापरायची झाल्यास सायकलला मधले स्टॅन्ड पाहिजेत. काळानुरूप लोक दुचाकीचा अतिवापर करू लागले आणि सायकल कालबाह्य झाली. मात्र, खेडेगावांमध्ये आजही गरज आणि शौक म्हणून सायकल वापरली जाते.
सायकलची ओळख ही एकोणिसाव्या शतकात झाली. ब्रिटीश माणसाने पहिली सायकल चालवण्यास सुरुवात केली. इतर खेळांसारखाच हाही एक खेळ प्रकार आहे. जास्त कौशल्याची गरज नाही, शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते, असे सायकलचे अन्य वाहनांच्या तुलनेत असंख्य फायदे आहेत. सायकल चालवणे सोपे आहे तसेच दिवसेंदिवस उद्भवणाऱ्या पार्किंगच्या गैरसोयीवरदेखील सायकल हा उत्तम पर्याय आहे.
- सायकलिंग हा एरोबिक्स प्रकार आहे, त्यामुळे शरीरावर जास्त ताण पडत नाही आणि दुखापत कमी होते. वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस सायकलिंग जरूर करावे. एका तासात ५०० ते ८०० कॅलरीज बर्न होतात.
- नियमित सायकल चालवण्याने हृदय, फुफ्फुसे आणि रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होते. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
- मधुमेहाचे प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. कमी कष्टाची कामे किंवा व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. जे लोक दररोज तीस मिनिटे सायकल चालवतात, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
- सायकल चालवल्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारीरिक गुण वाढत आहे. यामुळे खाली पडणे, हाडे मोडण्याची शक्यता कमी होते. सायकल चालवताना सांध्यावर कमी ताण पडतो. त्यामुळे दुखापत कमी होते.
- मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा हे सर्व सायकलमुळे कमी होते.
- सागर गुजर
Bycycle नावानं प्रुफला फोटो सेव आहे