मायणी : वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या नऊ जणांनी मायणीहून जगन्नाथपुरी (ओरिसा) हे १६०० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवरून सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान, ते ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधनाची बचत काळाची गरज, आरोग्यासाठी उत्तम व्यायाम, सायकल चालवा’ असा संदेश देत आहेत.
मायणी (ता. खटाव) येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने गुरुवारी सकाळी मायणी येथून जगन्नाथपुरी येथे सायकलद्वारे प्रवास सुरू केला आहे. विजय वरुडे, शिवाजी कणसे, राजेंद्र आवळकर, अनिल कुलकर्णी, सुनील कुलकर्णी (सर्व रा. मायणी) अंबरिश जोशी (रा. किर्लोस्करवाडी ता. पलूस), मिलिंद कुलकर्णी (रा. मिरज, ता. मिरज), किशोर माने (रा. सांगली) व सागर माळवदे (रा. पुणे) हे नऊजण सह्याद्र्री ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य या प्रवासात सहभागी झाले आहेत.
रखरखत्या उन्हात तळपत्या किरणांचे चटके सोसत त्यांनी हा प्रवास सुरू केला आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे त्यांनी केलेले साहस अनेकांच्या डोक्यात अंजन घालणारे ठरले आहे. जगन्नाथपुरी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर, तिरुपती बालाजी, गणपतीपुळे, नळदुर्ग आणि कन्याकुमारी असा सायकलने प्रवास केला आहे. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. सायकल प्रवासाचा प्रचार झाला पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. प्रवासाला संकल्प केल्यानंतर परिसरातील अनेक मित्रपरिवाराने साथ दिली. यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या प्रवासाला सुरुवात केली.मायणी ते जगन्नाथपुरी असा प्रवास मार्गमायणी येथील सात जण मंगळवेढा, सोलापूर, नळदुर्ग, उमरगा, भांगूर, हैद्राबाद, सूर्यापेठ, विजयवाडा, निडादवेल्लू, नाकापल्ली, राणास्थलम, हरीपूरम, मालुड, ब्रह्मगिरी व जगन्नाथपुरी असा १६५० किलोमीटरचा सायकलचा प्रवास करणार आहेत.एकेकाळी शहरातील रस्ते सायकलस्वारांनी गजबजल्याचे चित्र दिसून येत असे. मात्र, काळाच्या ओघात सायकली मागे पडल्या असून, इंधनावर चालणारी वाहने वाढली आहेत. यामुळे सायकली अडगळीत पडल्या असून, त्यांना प्रतिष्ठाप्राप्त करून देण्यासाठी सायकल प्रवास केला असल्याची माहिती सह्याद्री ट्रेकर्संनी दिली आहे.- शिवाजी कणसे
जगन्नाथपुरी प्रवासादरम्यान बेंगलोर -तेलंगणा मार्गावर घेतलेले छायाचित्र.