सातारा : सुसाट गाड्या चालवून अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी गस्तीला बाहेर पडलेल्या पोलिसांना प्रेमीयुगूलांनी चक्रावून सोडले. सुनसान आणि अंधारा असलेल्या यवतेश्वर घाटातील कठड्यांवर प्रेमी युगूल बिनधास्त बसलेले पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे काही अल्पवयीन मुलीही क्लास आणि मैत्रीणींच्या नावाने येथे सापडल्याने पोलीसही अवाक झाले.सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमागे बेफाम वेग हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बेदरकार वाहन चालविणाऱ्यांवर कारवाइ करण्याच्या उद्देशाने यवतेश्वर घाटातून मार्गस्थ होणाऱ्या पाेलिसांच्या गाड्या प्रेमीयुगूलांना पाहून थांबले. रात्री उशीरा घराबाहेर कसे सोडले या प्रश्नावर युगूलांनी दिलेली उत्तरे धक्कादायक होती. आवश्यक माहिती घेतल्यानंतर पालकांना बोलावून या युगूलांना सोडण्यात आले.कोणी क्लासला तर कोणी मैत्रीणीकडेयवतेश्वर घाटातील कठड्यावर रात्री उशीरा बसणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गस्तीच्या दरम्यान आढळून आलेल्या महिलांकडे रात्री उशीरा काय सांगून घराबाहेर पडला असे पोलिसांनी विचारले. त्यावर काही तरूणींनी एकस्ट्रा क्लास आहे, मैत्रीणीबरोबर खरेदी करायला बाहेर आलोय, मैत्रीणीच्या घरी बसून अभ्यास करतोय अशी कारणे सांगितली. यातील धक्कादायक बाब म्हणजे रात्री नऊ पर्यंत घराबाहेर असलेल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतही पालक निश्चिंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रात्रीच्यावेळी बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर आळा बसविण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना यवतेश्वर घाटात प्रेमीयुगूले आढळून आली. अंधारात नशेच्या अंमलाखाली असणाऱ्यांकडून तरूणींच्या बाबत चुकीचे काहीही होऊ शकते याचे भान तरूणांसह कुटूंबियांनीही ठेवावे. रात्री उशीरा मुलींना निर्जनस्थळी जाण्यापासून पालकांनीही अटकाव करावा. - विश्वजीत घोडके, तालुका पोलीस निरिक्षक