दहिवडी : १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून १५ हजार वृक्ष लावण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी बिदाल गावाची धडपड सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी लावलेली झाले आजही हिरवीगार आहे.वनविभागाने लावलेली झाडे वेगवेगळ्या गावात जळून जात आहेत. मात्र, बिदाल गावात नेमकी उलटी परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी बिदाल गावाने लावलेली झाडे आजही हिरवीगार आहेत.बिदाल गावाने वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला पाच फळझाडे देण्यात आली. स्पर्धेतील निकष पूर्ण करताना आणखी वेगळी झाडे लावण्यात आली. त्यानंतर शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमातून बिदालमध्ये वनविभागाने १५ हजार ६२५ झाडे लावली. ही झाडे लावून चालणार नाही तर ती टिकवली पाहिजेत, या भूमिकेतून ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर घेतला. जवळपास १ लाख २५ हजार रुपये या झाडांना पाणी देण्यासाठी खर्च करण्यात आले.वनविभागानेही गावाची तळमळ पाहून वेळोवेळी झाडांना पाणी देण्याचे नियोजन केले. ग्रामस्थ वनविभाग आणि ग्रामपंचायत या सर्वांच्या सहकार्यातून आज लावलेली जवळपास सर्वच झाडे हिरवीगार ठेवण्यात यश मिळाले आहे.वेळप्रसंगी श्रमदानातून या झाडांना पाणी देण्यात येत आहे. या झाडांची गोडी नोकरदारांना लागली असून, मुंबई, पुणे, सातारा येथे नोकरीनिमित्ताने गेलेली लोक गावाकडे जेव्हा येतात, त्यावेळी आवर्जून या झाडांना भेटी देतात. याठिकाणी करंज, चिंच, निंब, पिंपळ, वड, अशोक, गुलमोहर यासारख्या वीसहून जास्त जातींच्या वनस्पती आहेत.
पंधरा हजार वृक्षसंवर्धनासाठी बिदालकरांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:11 PM