लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बालकांच्या लसीकरणासाठी वापरणारी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत आहे. परिणामी लसीसाठी मोठी सुई वापरण्याने दंड दुखत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच डोस वाया जाण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना लसीचे २१ लाखांवर डोस देण्यात आले आहेत, तर प्रथम डोस घेणाऱ्यांची संख्या १५ लाखांवर आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीचा पुरवठा वाढल्याने मोहीम वेगाने सुरू आहे; पण लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा होत होता. तो कमी झाल्याने बालकाच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सिरिंज आता वापरण्यात येत आहे. ही सुई मोठी असते. त्यामुळे दंड दुखत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यातच या सुईमुळे लस वाया जाण्याचाही प्रकार घडत आहे.
कोरोना लस देण्यासाठी एडी सिरिंजचा पुरवठा कमी आहे. असे असले तरी सध्या तात्पुरती सोय म्हणून स्थानिक पातळीवर खरेदी करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.
..............................
एडी सिरिंजची वैशिष्ट्ये...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा केला जात आहे. कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यावर ती ऑटो लॉक होते. त्यामुळे एका कुपीत ११ ते १२ डोस होतात. एकदा डोस दिल्यावर ही सिरिंज पुन्हा वापरता येत नाही. एका डोसनंतर ही सिरिंज नष्ट करावी लागते.
........................................
२ सीसी सिरिंज अशी असते...
- लहान मुलांच्या नियमित लसीकरणासाठी आतापर्यंत २ सीसी या सिरिंजचा वापर केला जात आहे. ही सुई जाड असते.
- लस दिल्यानंतर हात दुखतो. रक्त येणे किंवा द्रावण सांडणे असे प्रकार होतात. यामुळे ०.१ ते दीड मिली द्रावण वाया जाऊ शकते.
...........................................
१५००० सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. तसेच बालक, माता, गर्भवती महिलांचेही लसीकरण सुरू असते. यासाठी जिल्ह्याला दिवसाला जवळपास १५ हजार सिरिंज लागतात, तर कोरोना लसीकरणासाठी सरासरी १२ ते १३ हजार सिरिंज आवश्यक असतात; पण जिल्ह्याला कोरोनाची लस किती उपलब्ध होते त्यावरही सिरिंजचा वापर किती होणार हे ठरते.
...............................................
वेस्टेज वाढणार...
एडी सिरिंज ऑटो लॉक होत असल्याने वेस्टेजचे प्रमाण फक्त मायनस १.०२ टक्के इतके आहे; पण आता २ सीसी सिरिंजमुळे हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
.......................................................
कोट :
केंद्र शासनाकडून कोरोना लसीकरणासाठी एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर सिरिंज खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापद्धतीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
............................................................