नवी दिल्ली - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सातारा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे.
लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घेतली जाईल अशी अपेक्षा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.
भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती. कारण विधानसभा निवडणुकीनंतर कदाचित भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून उदयनराजेंना पोटनिवडणूक कठीण जाऊ शकते अशी भीती त्यांना होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा पोटनिवडणुकीवर निर्णय न घेतल्याने उदयनराजेंना धक्का बसला आहे.
याबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, छत्रपतींचे 13 वे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते आता पक्षाचे पदाधिकारी आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार उदयनराजे जोरात करतील. राज्यात युती झाली तरी बंडखोरी नाही. शिवसेना-भाजपाचे संघटन मोठं आहे, नाराजी व्यक्त होऊ शकते पण बंडखोरी होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी
'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट
'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'
कसं काय...बरं हाय ना! भाजपाचा 'रम्या' देणार विरोधकांना प्रेमाचे डोस; कोण आहे तो?
युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही पंचंड आशावादी
Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर