कऱ्हाड : भाजप सरकारने घाईगडबडीत तीन शेतकरीविरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून, मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड तालुक्यात विधेयकाविरोधात सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, कऱ्हाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, मंगला गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ह्यशेतकरीविरोधी कृषी विधेयक मोदी सरकारने घाईघाईत आणले आहे. आपल्याला मिळालेल्या बहुमताचा शेतकरीविरोधी वापर मोदी सरकार करीत आहे. हे विधेयक शेतमालाची आधारभूत किंमत संपविणारे आहे.
यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या २ कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, शिवाजी मोहिते, हिंदुराव पाटील, प्रदीप जाधव, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, इंद्रजित चव्हाण, संदीप रंगाटे, पंकज पिसाळ उपस्थित होते.