पाटण : तालुक्याच्या मानाने पाटणच्या दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी, अशी येथील सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, या इच्छापूर्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेने लक्ष घालून तालुक्यातील खासगी रुग्णालयांना चाप बसवने गरजे आहे. मात्र अजून तसे झाल्याचे दिसत नसल्यामुळे पाटण तालुक्यातील खासगी रुग्णालयात अक्षरश: रुग्णांची लूट होताना दिसत आहे. रुग्णांची उपचार झाल्याची बिले भागविताना कर्जबाजारी होण्याची वेळ संबंधित कुटुंबांवर आल्याचे किती तरी प्रसंग समोर आले आहेत.तालुक्यातील खासगी दवाखान्यात जाल तर केस पेपर आणि इतर तपासण्या व मेडिकलचा खर्च भागविताना रुग्णांना नाकीनऊ आल्याशिवाय सुटका नाही. आणि आजार जर गंभीर असेल तर ५ हजार ते १० हजारांचे बिल रुग्णालयात भरल्याशिवाय तुम्ही घरी जाऊ शकत नाही. एकदा का तुम्ही या खासगी वैद्यकीय सेवेच्या कचाट्यात सापडला की रुग्णाची बिले भागविताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहात नाहीत. रात्री-अपरात्री जर घरातील व्यक्तींची प्रकृती अतिगंभीर असेल तर मोठा कठीण प्रसंग पाटणच्या जनतेवर उद्भवतो. एक तर अशावेळी पाटण तालुक्यातील खासगी दवाखाने दरवाजा उघडत नाहीत आणि जर उघडलाच तर नाईट चार्ज दुप्पट आणि ‘मूँह माँगी’ किंमत मोजावी लागते. या विळख्यातून सोडविण्यासाठी पाटणच्या जनतेला वाली हवा आहे.खासगी दवाखान्यांना त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेचा योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. मात्र, त्याही जर लुटालूट चालू असेल तर या अशावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जागरुक कधी होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)लॅबोरटरीवाले तर सर्वात पुढेरुग्णांचे रक्त किंवा लघवी तपासणी करावयाचे असेल तर खासगी रुग्णालयांशी अशा लॅबवाल्यांची साखळी असते. त्यांना लगेच संपर्क केला जातो. लॅबवाले येतात, गरजेप्रमाणे रक्त, लघवी व इतर तपासण्यासाठी नमुने नेतात. मात्र त्याचा रिपोर्ट येण्याआधी किमान ७०० रुपये व त्यापुढे फी घेतात. तिथेच रुग्णांचे नातेवाईक हतबल होतात. त्यानंतर मग डॉक्टरांचा बिल किती होणार, याची चिंता लागून राहते.शासनाने खासगी दवाखान्यांसाठी मेडिकल इम्प्लेमेंटरी बिल अॅक्ट निर्माण केला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी नाही. त्यानुसार रुग्णांच्या तपासण्या व औषधांचे दर दवाखान्यांनी फलकांवर लावले पाहिजेत, असा नियम आहे. तरीसुध्दा खासगी दवाखान्यांनी माणुसकीच्या भावनेतून रुग्णांचे बिल आकारावे.डॉ. दीपक साळुंखे, वैद्यकीय अधिकारी , पाटणपाटणच्या रुग्णांसाठी कराड येथील डॉक्टरांची यादी पाटणच्या डॉक्टरांजवळ असते. त्यामुळे रुग्ण आपल्या हाताबाहरे असल्याचे दिसतात. पाटणमधून कराडच्या डॉक्टरांची चिठ्ठी मिळते, तिथे रुग्ण तातडीने हलविण्याचे सल्ले दिले जातात. पाटण तालुक्यातील हजारो रुग्ण कऱ्हाडला नेले जातात. ही प्रथाच पडली आहे. मग कराडचा खर्च तर विचारायलाच नको.
आधीच आजार त्यात बिलांचा बाजार
By admin | Published: February 15, 2015 8:49 PM