रामापूर : ‘माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व पाटण अर्बन बँक यांच्याकडून पाटण येथील कोरोना केअर सेंटरला तालुक्यात प्रथमच दोन बायपॅप मशीन देण्यात आली आहेत. याचा तालुक्यातील बाधित रुग्णांना चांगला फायदा होणार असून, हे बायपॅप मशीन रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे,’ असे मत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा बँक व अर्बन बँकेच्या माध्यमातून पाटण येथील कोरोना केअर सेंटरला दोन बायपॅप मशीन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, डॉ. श्रीनिवास बर्गे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ‘तालुक्यातील बाधित रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी कऱ्हाड, साताराकडे घाव घ्यावी लागत होती. तेथे जाऊनही वेळेत बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी तालुक्यातच रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून व्हेंटिलेरप्रमाणेच काम करणारी बायपॅप मशीनही जिल्हा बँक व पाटण अर्बन बँकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या सेवेसाठी दिली आहेत. ही मशीन शासनाच्या रुग्णालयात बसवण्यात यावीत, म्हणजे कोविडनंतर देखील या मशीनचा फायदा तालुक्यातील जनतेला होईल, त्यासाठी काही मदत लागल्यास ती निश्चितच आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन देऊन, तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी कोविड काळात चांगले काम केले आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळेच आज तालुक्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँकेेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, संचालक दिलीपराव मोटे, के. आर. शिंदे, राजाभाऊ काळे, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी शंकरराव मोरे, सुधाकर देशमुख, पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे आदी उपस्थित होते.
फोटो :
तालुक्यातील कोविड रुग्णांकरिता बायपॅप मशीन प्रांत श्रीरंग तांबे व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे सुपूर्द करताना सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजाभाऊ काळे, अजय कवडे व इतर.