सातारा : गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे जमीनदोस्त असलेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला होता. पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता बर्ड फ्लूने मोठे संकट उभे केले आहे. ग्राहक अप्प्रचाराला बळी पडले, तर कष्टाने सावरलेला हा व्यवसाय पुन्हा एकदा मोडून पडेल, या भीतीने पोल्ट्रीधारक हबकले आहेत.
कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळीदेखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अप्प्रचार झाला आणि पोल्ट्री व्यावसायिकांना जिवंत कोंबड्या गाडून टाकाव्या लागल्या, मोफत वाटाव्या लागल्या. कोरोनाने या व्यवसायाला पूर्वार्धाच्या टप्प्यात जमीनदोस्त केले तरी, उत्तरार्धात मात्र चिकन आणि अंडी खाऊनच कोरोनाशी लढता येते, असा प्रचार झाल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा स्थिरस्थावर होऊ लागला. २०१७-१८ मध्ये राज्यात बर्ड फ्लूने धिंगाणा घातला होता. अख्ख्या पोल्ट्री बंद करून पिले व कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या. आता दक्षता म्हणून निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली जात आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
मायणी, येरळवाडी, कानकात्रे, सूर्याचीवाडी, नेर, दरुज, राजाचे कुर्ले, ढाकणी, पिंगळी, राजेवाडी, झाशी, आंधळी, महाबळेश्वराडी, बिचुकले, अरबवाडी, देऊर, नांदवळ, भाडळे, वीर, तांबवे, मुळीकवाडी, धोम, कण्हेर, उरमोडी, कुमठे तलाव, मांडवे तलाव, तांबवे तलाव, कृष्णा कोयना संगम, शिवसागर जलाशय, कांदटी खोरे, तापोळा, वेण्णा लेक आदी ठिकाणी नियमितपणे लक्ष आहे.
पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरू नये
जिल्ह्यात बर्ड फ्लू प्रादुर्भावाचा कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये, जर कावळे, पोपट, बगळे व स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने मृत झाल्याचे आढळल्यास त्वरित सूचना द्याव्यात. तसेच अंडी, कोंबडीचे मांस, अंडी उकडून खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. पक्षी, अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत.
जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पोल्ट्रीत मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावत असतील तर सुजाण नागरिकांनी माहिती द्यावी.
- अंकुश परिहार, पशुसंवर्धन अधिकारी
११बर्ड