कऱ्हाड : माणसांची गर्दी वाढली तशी सिमेंटची जंगलं विस्तारली. गावकुसाबाहेरही चार मजली इमारती उभ्या राहिल्या. अशा परिस्थितीत रस्त्याकडेला असलेल्या एखाद्या झाडाच्या फांदीवर पक्ष्यांनी आपली घरटी बांधली; पण ज्यावेळी विस्तारीकरणात झाडांवर कुऱ्हाड कोसळली त्यावेळी पक्ष्यांनी आपलं घरट सोडलं. नदीकाठावरच्या विस्तारलेल्या फांद्यांवर त्यांनी आपला खोपा विणला.
कऱ्हाड शहरात सध्या पक्ष्यांचा वावर कमी झाला आहे. यापूर्वी सोमवार पेठेतल्या एखाद्या पुरातन वाड्यात पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळायचा. मात्र, काळाच्या ओघात वाडे नामशेष झाले आणि पक्ष्यांचा चिवचिवाटही थांबला. शहराचा जसजसा विस्तार होत गेला तसतसा पक्ष्यांचा थवा शहरापासून दुरावला गेला. काही वर्षांपूर्वी ज्याठिकाणी गर्द झाडी होती, अशा वाखाण परिसरातही सध्या अपार्टमेंट, रो-हाउसेस उभी राहिली आहेत. त्यामुळे तेथील पक्ष्यांची राहुटी कमी झाली; पण शहरात सिमेंटचे जंगल निर्माण झाले असले तरी पक्ष्यांनी कऱ्हाड सोडलेलं नाही. शहरापासून जवळच असलेल्या कृष्णा, कोयना नदीकाठासह तालुक्यात पाणथळ क्षेत्रात अमाप पक्षिवैभव पहायला मिळत आहे. दीडशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचा परिसरात वावर असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.
स्थानिक पक्ष्यांबरोबरच काही पाहुणे पक्षीही शहराच्या आसपास पहायला मिळत आहेत. वातावरणानुसार त्यांनी केलेले ते ‘स्थानिक स्थलांतर’ असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे रंगीत करकोचा, पांढरा अवाक, काळा अवाक, ग्लोसी अवाक, व्हीजल हे पक्षी आपल्याला कऱ्हाडच्या आसपास पाण्याशेजारी पहायला मिळतात. वातावरणात बदल व पाण्याच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थानिक स्थलांतरित होतात, असे पक्षी अभ्यासक आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.
- कोट
पाहुण्या पक्ष्यांचे स्थलांतर भौगोलिक परिस्थितीनुसार काही दिवसांचे असते. कायमस्वरूपी ते एकाच ठिकाणी राहत नाहीत. कऱ्हाडमध्ये पाहुण्या पक्ष्यांबरोबरच स्थानिक पक्षिवैभवही अमाप आहे. दीडशेहून अधिक प्रजातींचे पक्षी येथे पहायला मिळतात.
- रोहण भाटे, पक्षी अभ्यासक
मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड
- चौकट
स्थानिक पक्षी
कावळा, खाटीक, हुदहुद, पोपट, आयोरा, शिंपी, सुतार, हळद्या, खंड्या, धनेश, मोर, धोबी, गायबगळा, मोठा बगळा, भारद्वाज, बुलबुल, सुगरण, ब्राह्मणी घार, रॉबिन, गव्हाणी घुबड.
- चौकट
पाहुणे पक्षी
आवाक, शिक्रा, युरेशियन कॉलर डोह, काळा आयबिस, रोलर ऊर्फ नीळकंठ, गॉडव्हीट, रंगीत करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा, शेकाट्या, पांढरा आयबीस, बार हेडेड गीज, चक्रवाक, टील.
- चौकट
... येथे वावरतायेत पक्षी
१) कृष्णा नदीकाठ
२) कोयना नदीकाठ
३) कऱ्हाडचे वाखाण
४) खोडशी धरण
५) टेंभू प्रकल्प परिसर
६) सुर्ली घाट परिसर
७) ओंड, उंडाळे तलाव
८) येवती, म्हासोली तलाव
फोटो : २४केआरडी०१, ०२, ०३, ०४, ०५, ०६
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यात आढळणाऱ्या अनुक्रमे टिकेल-ब्ल्यू फ्लाय कॅचर, युरेशिअन स्पुन बिल, हरियल, युरेशिअन कॉलर डव्ह, रंगीत करकोचे, चष्मेवाला या पक्ष्यांना मानद वन्यजीव रक्षक रोहण भाटे यांनी कॅमेराबद्ध केले आहे.