सातारा : महायुतीचे जागावाटपाचे त्रांगडे सुटले नसलेतरी सातारा जिल्ह्यात मात्र काही प्रमाणात मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. वाई, कऱ्हाड दक्षिण आणि कोेरेगाव भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता फक्त उमेदवारांचीच नावे जाहीर होण्याचे बाकी आहे. सातारा शिवसेनेकडे जाणार असून पाटण मात्र नेहमीप्रमाणे शिवसेनेकडेच राहणार आहे. दरम्यान, ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’ने स्वत:च पुढाकार घेत त्यांना राज्यात आणि जिल्ह्यात हव्या असलेल्या मतदारसंघाची यादी शिवसेना आणि भाजप नेत्यांना पाठविली आहे. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. बहुतांशी मतदार संघावर महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या प्रत्येकांनी दावा केला आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटपाचे त्रांगडे निर्माण झाले आहे. जे मतदारसंघ भाजपने मागितले होते, त्यापैकी काही मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’चा दावा आहे आणि जे ‘स्वाभिमानी’ने मागितले होते, त्याठिकाणी ‘रासप’चा दावा आहे. आमदार विनायक मेटे यांच्या ‘शिवसंग्राम’नेही जिल्ह्यात दोन जागा मागितल्या आहेत.महाराष्ट्रात कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचे निश्चित झाले नसल्यामुळे महायुतीत सहभागी घटक पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी संतापलेल्या खोत आणि जानकर यांनी सेना-भाजपवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेकदा आगपाखड केली आहे. जागावाटप करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’ने स्वत:च पुढाकार घेत ‘रिपाइं’ आणि ‘शिवसंग्राम’शी चर्चा केली आणि या चारही पक्षांना हव्या असलेल्या मतदारसंघाची यादी शिवसेना आणि भाजप नेत्यांना पाठविली आहे.गेल्या निवडणुकीत सेना-भाजपबरोबर रासप, स्वाभिमानी, शिवसंग्राम हे पक्ष नव्हते. आता या पाचही पक्षांची मिळून महायुती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते प्रत्येक मतदारसंघावर दावा करू लागले आहेत.गेल्या निवडणुकीत भाजपकडे कऱ्हाड दक्षिण, माण आणि सातारा हे तीन तर वाई, पाटण, कोरेगाव, फलटण आणि कऱ्हाड उत्तर हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. आता मात्र भाजपने पुर्वीचे तीन आणि आता कोेरेगाव आणि वाई असे आणखी मतदारसंघ मागितले आहेत. ‘कऱ्हाड उत्तर’वर स्वाभिमानीचा प्रबळ दावा आहे. शिवसेनेने मात्र अजूनही तितकी आक्रमकता दाखविलेली नाही. ‘रिपाइं’ कोणत्या जागेवर दावा करणार, याविषयी अजून कोणतेही भाष्य खासदार रामदास आठवले यांनी केलेले नाही. फलटण विधानसभा स्वाभिमानीला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे शिवसेना आता अन्य कोणत्या मतदारसंघावर दावा करणार, याकडे अनेकांच्या नजरा आहेत. (प्रतिनिधी)सारेच ‘स्वाभिमानी’ला तर ‘रासप’ला काय ? सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यातील प्रमुख जागांवर ‘स्वाभिमानी’ने दावा केला होता. त्यामुळे संतापलेल्या महादवे जानकर यांनी ‘सारेच स्वाभिमानीला देणार असालतर रासपला काय’ असा सवाल उपस्थित केला आहे. जानकर म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील एकमेव दौंडची जागा आम्ही घेणार आहे. तासगाव-कवठेमहांकाळसाठी साठी इच्छुक होतो, मात्र तेथे आम्ही माघार घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर आणि मोहोळसाठी आमचे प्रयत्न आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीवरही आमचा दावा होता. मात्र, सकारात्मक चर्चा होत असल्यामुळे आम्ही दोन पावले मागे येत आहे.’ तो विषय त्यांचा आहे...फलटण विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानीकडे गेला असल्याचे स्पष्ट संकेत आहेत, त्यामुळे भाजपची काय भूमिका असणार आहे, या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांना छेडले असता त्यांनी यावर भाष्य टाळले. मात्र जाता-जाता त्यांनी ‘हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता जर तो स्वाभिमानीकडे गेला असलातर तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे स्पष्ट केले. उध्दव ठाकरे-सदाभाऊ खोत यांच्यात चर्चाजागावाटपात दिरंगाई होत असल्यामुळे स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांनी सोमवारी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे भेट घेतली आणि आपले गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आ. दिवाकर रावते यावेळी उपस्थित होते. खोत यांनी यावेळी जागा मागणीची यादीही दिली. दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी सर्व म्हणणे ऐकून घेत दि. ५ आणि ६ सप्टेंबर असे दोन दिवस स्वाभिमानी तसेच इतर घटक पक्षांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट करतच जागावाटपाच्या अनुषंगाने अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितले.
वाई अन् साताऱ्यात भाजप-सेनेचे साटेलोटे
By admin | Published: September 01, 2014 11:38 PM