दहीवडी : आमदार जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आलिशान १४ चारचाकी गाड्या ह्या ठेका आणि इतर कामांच्या कमिशनमधून व मृत व्यक्तींना जिवंत दाखवून कमावलेल्या करोड रुपयांच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. माढा आणि सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव झाला आहे,’ असा आरोप अभयसिंह जगताप यांनी केला आहे.दहीवडी येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अभयसिंह जगताप म्हणाले, ‘आमदार गोरे सांगतात की, माझ्याकडे १४ चारचाकी गाडी आहेत. त्या गाड्या त्यांच्या नावावर आहेत का? त्या गाड्या मेलेल्या माणसाच्या नावांवर पैसे काढून, कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन घेऊन, इतर अन्य अवैध कामाच्या भ्रष्टाचारातून घेतलेल्या आहेत हे माण खटावच्या संपूर्ण जनतेला माहीत आहे. मी घेतलेली गाडी ही स्वतःच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाच्याही पापाचा एक रुपया नाही. मी सरकारला कायदेशीररीत्या इन्कमटॅक्स भरतो. मी इच्छापूर्ती म्हणून गाडी घेतलेली नाही. गेल्या महिन्यामध्ये माझ्या गाडीचा लोणंद फलटण महामार्गावर अपघात झाला होता. त्यामध्ये माझा जीव वाचला व माझ्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते म्हणून मी दुसरी गाडी स्वतःच्या संरक्षणासाठी घेतली, याचे आमदार गोरे यांना वाईट वाटले की, त्यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगण्याची वेळ आली. जयकुमार गोरे यांनी २०१९ च्या निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्र जमा केले. त्यानुसार २०१५ चे उत्पन्न २२ लाख दाखविले. २०१७ ला ३३ लाख ९६ हजार, २०१८ चा ३९ लाख ९१ हजार रुपये दाखविले आहे. एवढ्या साऱ्या उत्पन्नाची बेरीज केली तरी एक आलिशान गाडी येऊ शकत नाही. त्यामुळे आमदार गोरे यांनी घेतल्यात १४ गाड्या ह्या गैरव्यवहाराच्या पैशाच्याच आहेत.मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड सेंटर उभा करून शेकडो मृत व्यक्तींना जिवंत दाखवून मागासवर्गीय मृत व्यक्तीची जमीन नावावर करून घेऊन करोडो रुपये कमावले. त्यातून आलिशान गाड्या घेऊन तुम्ही फिरता. आम्ही वरकुटे मलवडी येथे स्वखर्चातून कोरोना सेंटर उभा करून विनामूल्य सेवा करून अनेकांना जीवनदान दिले. आम्ही पुण्य कमावले आहे तुम्ही पापाचे घडे भरलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यांत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे वक्तव्यदेखील अभयसिंह जगताप यांनी केले.
तर ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाहीतमाढा लोकसभेला माण-खटावमधून २३ हजारांचे मताधिक्य कोट्यवधी रुपये वाटून मिळाले आहे. आमदार गोरे यांनी पैसे नाही वाटले तर ग्रामपंचायत ही जिंकता येणार नाही पण राष्ट्रवादीला मिळालेले मतदान हे कोणालाही पैसे न वाटता प्रेमाने मिळालेले आहे, असेही ते म्हणाले.