आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. १0 : भाजपाने सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत . वेळ येईल त्याप्रमाणे शब्द फिरवून जनतेची फसवणूक केली जात आहे. भाजपाचे सरकार म्हणजे रंग बदलणारा सरडा आहे. अशी घणाघाती टीका करीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी लढा देणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले.असवली, ता . खंडाळा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कृषी सभापती मनोज पवार, तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा परिषद सदस्य उदयदादा कबुले, दिपाली साळुंखे, शारदा ननावरे, मंगेश धुमाळ, शशिकांत पिसाळ, राजेंद्र राजपुरे, सभापती मकरंद मोटे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, नगराध्यक्ष शरद दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, शामराव गाढवे, अजय भोसले, उपसरपंच सचिन ढमाळ यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.धनंजय मुंडे पुढे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवून जनतेला फसवलं. कष्टकऱ्यांनी घाम गाळून कमावलेला पैसा नोटबंदी निर्णयाने अडकून पडला. मोदींचं हे मोठं पाप होतं. त्याने कुणाचाही फायदा झाला नाही की काळा पैसा बाहेर आला नाही. मोदी सरकारने सत्तेवर आल्यावर प्रथम मांसबंदी, नोटबंदी व त्यानंतर लाल दिवा बंदी केली या विचित्र सरकारला आळा घातला नाही तर हे नसबंदी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही मुंडे यांनी केली.प्रास्ताविकात दत्तानाना ढमाळ म्हणाले, खंडाळ्यातील शेतकऱ््यांच्या समस्या मिटवण्यासाठी मकरंदआबांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे. जनतेची कणव असणार आमदार लाभले हे खंडाळ्याचे भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली .यावेळी असवली येथील ग्रामसचिवालय, स्व. सोनबा ढमाळ सभागृह, अंगणवाडी इमारत व साई आंगण वास्तूचे उद्घाटन तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फसवलं जातयं. अधिवेशनात अनेकदा आवाज उठवूनही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं गेलं. उत्तरप्रदेश मधील शेतकरी यांना दिसतात मग महाराष्ट्रातील शेतकरी नाहीत काय? असा सवालही त्यांनी केला. कर्जमाफी छोटी की मोठी याचा हिशोब न मांडता महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी केवळ अल्पभूधारकच नव्हे तर सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. असे आवाहनही त्यांनी केले.
सरकार फसव्या जाहीराती करण्यात पटाईत : मकरंद पाटील
आमदार मकरंद पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारची आता उलटी गीणती सुरू झाली आहे. फक्त फसव्या जाहिरातबाजी करण्यात हे सरकार पटाईत आहे, त्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले का? उद्योजकांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या सरकारला गेल्या तीन वषार्तील शेतकऱ्यांच्या समस्या का दिसत नाहीत . शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही संघषार्ला कुठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले .