शिरवळ : ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणत सत्तेत आलेल्या भाजपने सर्वसामान्यांच्या हिताच्या अनेक योजना बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शंभर दिवसांत काळा पैसा आणू म्हणणारे हतबल ठरले. टोल बंद करण्याऐवजी त्यांनी टोल सुरू केले. एलबीटी व धनगर आरक्षणाचे विषय त्यांनी बाजूला फेकून दिले. खोटी आश्वासने देण्यात भाजप सरकारचा हात कोणी धरू शकत नाही, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.शिरवळ (ता. खंडाळा) येथे आमदार राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवीन पाणीपुरवठा व वितरण व्यवस्थेचे उद््घाटन, नाबार्डच्या माध्यमातून रामेश्वर मंदिराजवळील पुलाचे भूमिपूजन, दिवंगत तुकाराम संतोबा कबुले सांस्कृतिक भवनाचे उद््घाटन व आमदार मकरंद पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे, आनंदराव शेळके-पाटील, शशिकांत पवार, बकाजीराव पाटील, वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड, दत्तानाना ढमाळ, रमेश धायगुडे, बाळासाहेब सोळस्कर, सुरेखा पाटील, सारिका माने, दीपाली साळुंखे, चंद्रकांत मगर, आदेश भापकर, विशाल परखंदे, ग्रामविकास अधिकारी बी. जी धायगुडे आदी उपस्थित होते.आमदार मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, शिरवळच्या सरपंच छाया जाधव, उपसरपंच उदय कबुले आदींनी मनोगत व्यक्त केले. मकरंद पाटील यांच्या सत्कारानंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नवनाथ ढमाळ, मूर्तिकार विठ्ठल गिरे यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. राजेंद्र तांबे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गुंजवटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)महाराष्ट्र विभक्त करण्याचा डाव‘हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेला, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांतून घडलेला महाराष्ट्र विभक्त करण्याचा डाव मुख्यमंत्री, केंद्रातील काही मंत्री आणि काही आमदारांनी रचला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करून वेगळा विदर्भ करण्याचा त्यांचा मानस आहे,’ असा आरोप अजित पवार यांनी केला. शिरवळ ग्रामपंचायतीच्या विकासाच्या मॉडेलचे त्यांनी कौतुक केले. शिंदे, रामराजेंची फटकेबाजी‘जिल्हा नियोजन समितीत अनेक ‘मार्गदर्शक’ निर्माण झाले असून, सध्या विकासाचे राजकारण संपुष्टात आणणारे राजकारण होत आहे,’ असे म्हणून रामराजेंनी अनेक किस्से सांगत अजित पवार, शशिकांत शिंदे यांनाही कोपरखळ््या मारल्या. शशिकांत शिंदे यांनी नितीन भरगुडे यांना ‘बाबांच्या नादी लागले आणि अडचणीत आले,’ अशी कोपरखळी मारत हास्यकल्लोळ निर्माण केला.
भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले
By admin | Published: February 01, 2015 10:40 PM