भाजपकडे सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय पर्याय नाही : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 01:10 PM2020-11-07T13:10:48+5:302020-11-07T13:36:14+5:30
राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.
सातारा : राज्यातील आमचे सरकार पाच वर्षे चांगलेच चालणार आहे. पण, विरोधकाकडील आमदारांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य पक्षाला टिकवून ठेवायचंय आहे. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही,,अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.
सातारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनल पटेल, अॅड. सुरेश कुराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे रजनी पवार, धनश्री महाडिक, प्रल्हाद चव्हाण, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस कमिटीत प्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनादरम्यान, मंत्री थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी व जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. देश सांभाळावा असे नेतृत्व बाबांचे आहे. काळाच्या ओघात काहीही होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे दिले. आता नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार आहे. अतिवृष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात काका आणि बाबा एकत्र आले, याचा फायदा होईल, असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.
भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचंय : पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस कमिटीत मार्गदर्शन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४० हून अधिक नेते त्यांच्याकडे गेले. निवडणूक आयोग, सीबीय यासह अनेक संस्था भाजपने कॅप्चर केल्यात. भाजपला हिंदुत्ववादी सरकार आणायचं आहे, अशी जोरदार टिकाही चव्हाण यांनी यावेळी केली.