कोरेगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम करत आहेत. हे जनतेला चांगले माहीत आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमान केला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
वडाचीवाडी येथे सह्याद्री मंगल कार्यालयात जरंडेश्वर कारखाना आंदोलनविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याची चर्चा साताऱ्यात होती. मीही तसे ऐकून होतो, मात्र नुकत्याच झालेल्या विस्तारामध्ये त्यांना संधी न देऊन पश्चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे.’
शिंदे म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने ताकद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील सरकारमध्ये वजन असते. या सरकारद्वारे त्यांनी विकासकामे निश्चितपणे केली असती, मात्र भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करुन घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते.’
चौकट
‘ईडी’ला सळो की पळो करुन सोडू
जरंडेश्वर कारखान्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कारखाना बंद राहिला तर शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ४१ कारखान्यांविषयी तक्रार करत असतील आणि केवळ जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची जप्तीची कारवाई होते. तर यात शंभर टक्के राजकारणच आहे. ईडीला आम्ही घाबरत नाही, एकदा का जर शेतकरी पेटून उठला तर ईडीला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय शांत बसणार नाही, हे राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.