कऱ्हाड : गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेल्या कऱ्हाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या चर्चेला शनिवारी पूर्णविराम मिळाला. निवडीपूर्वी ‘लोकशाही’ने दिलेला निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळण्याबाबतचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अखेर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी विशेष सभेत फारूक पटवेकरांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर मात्र सभागृहात भाजप, जनशक्तीच्या नगरसेवकांत ‘खुशी’ तर ‘लोकशाही’च्या नगरसेवकांत ‘गम’ पाहायला मिळाले.येथील पालिकेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. निवडीसाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी विशेष सभा बोलविली होती. सभेस उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर आदींसह नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी सभागृहात नामनिर्देशित सदस्य निवडताना सभागृहास त्याचा फायदा व्हावा, संबंधित व्यक्ती नोंदणीकृत आघाडी, राजकीय पक्षाला प्राधान्यक्रम द्यावा, अपक्षाचा विचार होऊ शकत नाही आणि अपक्षाचा गटही अस्तित्वात नसेल तर त्यातील व्यक्तीस स्वीकृत नगरसेवकपदास पात्र ठरविता येऊ शकत नाही, असे शासनाच्या अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज मान्य करू नये, अशी मागणीही पाटील यांनी केले. त्यावर पावसकर म्हणाले, ‘अपक्ष हा पक्ष आणि आघाडी सोडून उभा राहतो. आणि लोक त्याला निवडून देतात. तो जनततेतून आलेला आहे. त्यामुळे त्यालाही ही संधी मिळणे गरजेचे आहे.’
अखेर सौरभ पाटील व पावसकर यांच्यातील संभाषणानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी फारूक पटवेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याची घोषणा केली. घोषणेनंतर सर्वांच्या वतीने फारूक पटवेकर यांचा सत्कार करण्यात आला.निवड होताच पालिकेत मेहरबान..मेहरबान...कऱ्हाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपच्या वतीने नामनिर्देशन पत्र फारूक पटवेकर यांनी दाखल केले होते. दरम्यान, शनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत फारूक पटवेकर यांच्या निवडीची घोषणा होताच. पालिका आवारात पटवेकर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि ‘मेहरबान..मेहरबान’ म्हणून आवाज घुमला.आम्हाला भूमिका तरी मांडू द्या : सौरभ पाटीलस्वीकृत नगरसेवकपदाची ही निवड आहे. ही काही निवडणूक नाही. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपद निवडताना कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे. याबाबत आमची भूमिका तरी नगराध्यक्षा यांच्यापुढे मांडू द्या, असे मत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी विशेष सभेदरम्यान व्यक्त केले.आणखी एक पती-पत्नी नगरसेवकसध्या पालिकेत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व विद्या पावसकर हे पती-पत्नी नगरसेवक म्हणून काम पाहतात. आता फारूक पटवेकर यांची नव्याने स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते व त्यांच्या पत्नी अपक्ष नगरसेविका मिनाज पटवेकर हे आणखी एक दाम्पत्य पालिकेच्या सभागृहात पाहायला मिळणार आहे.