सातारा : ‘आपला पक्ष सर्वांत मोठा आहे. तो आणखी वाढवायचा पण, संख्येने नाही तर लिडरनी. त्यामुळे मला हार-तुरे नकोत. प्रभावी काम करून दाखवा. कारण, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तयार रहा,’ असा सल्ला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.
सातारा येथे भाजप कार्यालयात महिला पदाधिकारी मेळाव्यात वाघ बोलत होत्या. यावेळी सुवर्णा पाटील, सुनिशा शहा, सुरभी भोसले, अर्चना देशमुख, गीता लाेखंडे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, ‘भाजप पक्ष लुंगा-सुंगा नाही. या पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६-१८ तास काम करतात. आपण पक्षाची जबाबदारी घेतली आहे. त्या पदाला न्याय दिला पाहिजे. मंडल अध्यक्ष सक्षम झाली पाहिजेत. राजकारणात मी म्हणणारे टिकत नाहीत, तर आम्ही म्हणणारे राहतात. पक्षाचे काम आव्हानात्मक असलेतरी आपली जबाबदारी कमी होत नाही. आता तर आपलं सरकार असल्याने जबाबदारी हजारपटीने वाढली आहे.
आपले सरकार कोणाला पाठीशी घालत नाही. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहे. जिल्ह्यात कोठे चुकीचे काय झाले तर कोणाच्या फोनची वाट पाहू नका. तेथे त्वरित जाऊन पोहोचा. त्या कुटुंबाची भेट घ्या. पोलिस ठाण्यात जाऊन कलमे कोणती लावलीत त्याचीही माहिती घ्या. कारण महिलेवर अत्याचार झाला तर तो तिच्या शरीरावर होत नाही. संपूर्ण आयुष्यावर होतो. महिलांना भावनिक आधार द्या, तिची मैत्रीणही बना.
राजकारणात शाॅर्टकट नाही. तो शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण हे बघूनच शिकायचे असते, असे सांगून वाघ पुढे म्हणाल्या, ‘राजकारणाकडे प्रोफेशनल म्हणून पहा. पक्षाच्या बैठका घ्या. लोकांच्या समस्यांचे विषय घेऊन तेही सोडवा. पद घेतले त्याला काम करून न्याय द्यावा.
रोज सकाळचे सर्वज्ञानी चुकले...
चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संजय राऊत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. दररोज सकाळी सर्वांना सर्वज्ञान देणारे हे सामान्य ज्ञानी कसे हे कळले नाही, अशा शब्दात राऊत यांचा समाचार त्यांनी घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"