सातारा : मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मी अनेक आंदोलनांत सहभागी झालो. आता माझ्यावरच शंका उपस्थित करण्याचा प्रकार भाजप नेत्यांनी सुरू केलेला आहे. सरकारने आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मात्र न्यायालयीन निकाल विरोधात दिला. भाजप नेते आता याचे राजकारण करीत असून, त्यांनी जनतेच्या भावनांशी खेळू नये, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
आमदार शिंदे म्हणाले, भाजपचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी १०२ वी घटनादुरुस्ती केली. देवेंद्र फडणवीस आणि जी कार्यवाही केली होती, तिला पुढे नेण्याचे काम आमच्या सरकारने केले. महाविकास आघाडी सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपचे नेते गैरसमज पसरवत आहेत. मराठा आरक्षण मुद्द्यावर जेव्हा-जेव्हा संघर्षाची वेळ आली, तेव्हा-तेव्हा मी तो केला आहे, जनता त्याला साक्षी आहे. तसेच मी कोणालाही दमदाटी केली नाही. पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांना घरी जाऊन जाब विचारला; तसेच त्यांना हे चुकीचे आहे, अशी समजदेखील दिलेली आहे, असे स्पष्टीकरण आमदार शिंदे यांनी केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर इथून पुढच्या कालावधीत जो काही संघर्ष करायचा आहे, त्यासाठी जी जबाबदारी माझ्यावर पडेल, ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करीन, अशी ग्वाहीदेखील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.