प्रमोद सुकरेक-हाड : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षात ताणाताणी सुरू आहे. त्यातच विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली असल्याने वातावरण भलतेच तापले आहे. सर्वच पक्षांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, अशी परिस्थिती एकीकडे असताना, दुसरीकडे मात्र बुधवारी कऱ्हाडात भाजपचे खासदार संजय पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या गाडीतून एकत्रित कार्यक्रमाला प्रवास करताना दिसून आले. त्याची चर्चा झाली नाही तर नवलच!सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. पण या आघाडीत सगळेच आलबेल आहे, असे मात्र नक्कीच नाही. या बिघाडीचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही पाहायला मिळाले. आता विधानपरिषद निवडणूक होऊ घातली आहे. भाजपने एक उमेदवार जादा रिंगणात उतरवित रंगत वाढविली आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये अविश्वासाचे निर्माण झालेले दिसते. त्यामुळे वातावरण तणावपूर्णच आहे.पण बुधवारी कऱ्हाडात मात्र हा तणाव कुठेच दिसला नाही. कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील एका खासगी दौऱ्यासाठी विमानाने दुपारी कऱ्हाडात पोहोचले. तेव्हा त्यांच्या स्वागताला चक्क भाजपचे खासदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत यादव, लालासाहेब पाटील, पोपटराव साळुंखे, पांडुरंग चव्हाण, गंगाधर जाधव, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे आदींनी जयंत पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना गाडीत बसायला सांगितले अन् ते दोघेच गाडीत बसून पुढे निघून गेले. आता या दोघांमध्ये नेमके काय गुफ्तगू झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काँग्रेस ते भाजप व्हाया राष्ट्रवादी...
- मंत्री जयंत पाटील व खा. संजय पाटील यांचे तालुके सांगली जिल्ह्यात एकमेकांच्या शिवधडीला लागून आहेत अन् संजय पाटलांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो काँग्रेस ते भाजप असला तरी, तो व्हाया राष्ट्रवादी झाला आहे.
- जयंत पाटलांचा आणि खासदार संजय पाटील यांचा यापूर्वी खांद्याला खांदा लागला आहेच. पण तरीही बुधवारी वाळवा अन् तासगावकरांच्या जवळीकतेची कहाडसह सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु होती.
चाय पे चर्चामंत्री जयंत पाटील व खासदार संजय पाटील यांनी विमानतळावरील विश्रामगृहात चहा पिताना चर्चाही केली. आता ही चर्चा नेमकी काय झाली, हे नेमके माहीत नाही. मात्र, त्या दोघांनी पिलेला चहा 'काळा' होता बरं!