सातारा: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. आगामी नगरपालिकां निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, आता आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक चढलेली पाहायला मिळत आहे. यातच साताऱ्यात दोन राजघराण्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करताना घराण्याची आठवण करून दिली आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने-सामने आले आहेत. उदयनराजे यांच्यावर टीका करताना शिवेंद्रराजे यांनी आपले घराणे कुठले आणि आपण करताय काय, असा थेट सवाल विचारला आहे. यानंतर आता यावर उदयनराजे काय प्रतिक्रिया देतात, यावर चर्चांना उधाण आले आहे.
स्कूटर चालवण्यापेक्षा नगरपालिका नीट चालवा
उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरे झाले असते. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू आहे, अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली आहे.
१० वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली नाही का?
खासदार उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असे नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. मग १० वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली नाही का की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहिती नव्हता, अशी विचारणा शिवेंद्रराजे यांनी केली आहे. तसेच रामराजेंना दाखवतो आणि बघतोची भाषा केली, त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचे. आपले घराणे कुठले? छत्रपती घराणे आहे, असा टोलाही शिवेंद्रराजे यांनी लगावला.