दीपक शिंदेसातारा : ‘तोडाफोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांची रणनीती होती. देशाच्या राजकारणात मात्र ही रणनीती चांगलीच रुजली आहे. आता गावागावातही याच रणनीतीचा वापर केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातही अशाच रणनीतीचा वापर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपला बुथ कमिट्यांनी साथ दिली आहे. गावपातळीवर लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करत राहण्याच्या पद्धतीमुळे केवळ शहरी भागापुरता असलेला हा पक्ष आता ग्रामीण भागातही चांगला रुजू लागला आहे.सातारा जिल्हा हा सुरुवातीस काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपकडे वाटचाल करू लागला आहे. एवढ्या कमी ग्रामपंचायतीवर असा निष्कर्ष काढता येणार नाही; पण भाजपची वाटचाल त्यादृष्टीने सुरू आहे. याची दखल इतर पक्षांनी घेतली पाहिजे. सातारा तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपच्या गळाला लागल्यामुळे सातारा आणि आजूबाजूच्या तालुक्यांमधील राजकारणच बदलले आहे. सध्या झालेल्या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकाही विरोधी गटाने काम केले नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व ग्रामपंचायती या शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने ताब्यात घेतल्या. पर्यायाने त्या भाजपच्या ताब्यात आल्या. यापूर्वी काही गावांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध खासदार उदयनराजे भोसले अशी पॅनल पडत होती. मात्र, खासदार उदयनराजेंनी ग्रामीण भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणच्या लोकांना आता शिवेंद्रसिंहराजे यांच्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे एका गावात दोन पॅनल पडले तरी दोन्ही पॅनल शिवेेद्रसिंहराजे यांच्याच गटाचे होते. त्यामुळे ‘जीत भी मेरी आणि पट भी मेरी’ अशीच स्थिती झाली.
पाटणमध्ये शंभूराज देसाई यांनीदेखील पाटणकर यांना पूर्णपणे मात देऊन २६ पैकी २० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. खरे तर शंभूराज देसाई यांच्यापेक्षा पाटणकर यांना सध्या काम करण्यास भरपूर संधी होती. मात्र, देसाई मंत्री असल्याने त्यांनी अगदी छोट्या वाड्या वस्त्यांपर्यंत निधी पोहोचविला. सत्तेचा पुरेपूर वापर करून त्यांनी अनेक ग्रामपंचायती सोबत जोडल्या आहेत. किमान पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी या ग्रामपंचायती सोबत ठेवण्यात त्यांना नक्कीच यश येणार आहे. पाटणकर गटाला मात्र सत्तेपुढे आपले अस्तित्व टिकवून ठेवताना कसरत करावी लागणार आहे. त्यांच्याकडे फार कष्ट करण्याची तयारी दिसत नसल्याने ताब्यातील ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होण्याचे प्रकार वाढत आहेत.कऱ्हाडमध्ये स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक झालेल्या १२ पैकी आठ जागा आपल्याकडे राखल्या आहेत. काँग्रेसने ३ जागा मिळविल्या, तर भाजपला एकच जागा आपल्याकडे राखता आली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या पॅनलमध्ये लढत होती. या दोन्ही पॅनलनी विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या लढतीसारखीच लढत दिली. त्यामुळे दोघांसाठीही या गावची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
वाई तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांनी निवडणूक झालेल्या १६ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर मकरंद पाटील यांनी वर्चस्व राखले आहे. मात्र, त्यांच्या ताब्यातील शहाबाग आणि वेळे या दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. आमदार गटाला याचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.खटावमध्ये आमदार महेश शिंदे यांनी आपले वर्चस्व राखले आहे. त्याचवेळी कोरेगावमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनाही यश मिळाले आहे. त्यांनी ४ पैकी ३ ग्रामपंचायती आपल्याकडे राखल्या आहेत, तर फलटणमधील ४ जागांपैकी दोन जागा या राजेगटाने, तर दोन जागा या खासदार निंबाळकर गटाने मिळविल्या आहेत.
भाजपचे ग्रामीण भागात बस्तान
जिल्ह्यातील एकूणच परिस्थिती पाहता भाजपने ग्रामीण भागातही आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत साताऱ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच दोन्ही पक्षांचा बोलबाला असायचा. शिवसेना थोडा फार प्रभाव टाकत असायची; पण अलीकडे भाजपने ग्रामीण भागावर अधिक लक्ष दिल्यामुळे ते ग्रामीण भागात आपले बस्तान बसवू लागले आहेत.बुथ कमिट्या ठरताहेत महत्त्वाच्याभाजपचा कार्यकर्ता सध्या बुथ कमिट्यांवर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांसाठी सुरू केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आणि त्याचा लाभ त्यांना देण्याचे काम केले जात आहे. एकूण ४८ योजना आहेत. यापैकी एका तरी योजनेमध्ये ग्रामीण भागातील व्यक्ती सहभागी असतात. त्याचा लाभ देण्याचे काम केले जात आहे. कोणाला घरकुल, कोणाला किसान सन्मान, तर कोणाला कर्ज योजनेचा लाभ मिळवून दिल्याने भाजपचा जनाधार वाढत आहे.