सातारा: आताच्या घडीला महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा ससेमिरा पाठी लागल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. यातच आता भाजप खासदार उदयनराजे यांनी राज्यातील एकूण घडामोडींवर संताप व्यक्त केला असून, हिंमत असेल, तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो, असे म्हटले आहे.
एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे, असे सांगत उदयनराजे यांनी भाजपसहित इतर पक्षांवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.
जसे आपण पेरतो तसे उगवतो
जसे आपण पेरतो तसेच उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, असे सांगत ईडी कारवाईंच्या मागे भाजप असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता, कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे. बास झाले आता राजकारण, असे उदयनराजे यांनी ठणकावले.
दरम्यान, इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटले ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतेय, या हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विधानानंतर एकच खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.