सातारा: राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. कारण, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे यांना रशिया-युक्रेन संघर्ष, मराठा आरक्षण आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाची होत असलेली कारवाई यांसारख्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे हे २६ तारखेला उपोषणास बसणार असून, मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेले बरे, असे सांगत खासदार उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सगळीकडे राजकारण आणणार असाल, तर बोलून बोलून तोंडाची चव गेली असल्याचे खासदार उदयनराजेंनी सांगितले आहे.
लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे
अनेक गोष्टी उघडपणे बोललो असून, राजकारण म्हणून बोललो नाही. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाल्याचे चित्र दिसत आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मियता असायला हवी. पण, ती आता कमी होत चालली आहे, असे स्पष्ट मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. हे कर्म आहे, याच जन्मात परतफेड करावी लागते. याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर तथ्य नसते तर ते झाले नसते, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर नेत्यांविरोधात होत असलेल्या कारवाईसंदर्भात व्यक्त केली.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी रशिया आणि युक्रेन संघर्षातून युद्धापर्यंत गेलेल्या परिस्थितीचा निषेध केला. दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये या संघर्षात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत, त्यांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने जबाबदारी समजून प्रत्येकाला परत आणण्याचे संपूर्ण पणाला लावले पाहिजे, असे उदयनराजे यांनी सांगितले.